नगरसेवक अपात्रेवर 10 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात कामकाज

0

जळगाव: घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या महापालिकेच्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला आहे. पाचही नगरसेवकांतर्फे गेल्या तारखेला 12 नोव्हेंबर रोजी दस्तऐवजाची मागणी करण्यात आली होती. ते दस्ताऐवज आज सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी याचिकाकर्त्यांनी संबधीताना सपुर्द केली. पुढील कामकाज 10 डिसेंबर रोजी होणार आहे. घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक, पदाधिकार्‍यांसह 48 जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व कैलास सोनवणे या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. या, पाचही विद्यमान नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी लावून धरली. मात्र ते सभागृह सदस्य नसल्याने त्यांच्याऐवजी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी 16 मार्चला दावा दाखल केला.

न्यायालयाच्या आदेशाने पाचही नगरसेवक 12 नोहेंबरला न्यायालयात हजर राहिले. वकिल लावण्यासाठी व दस्तऐवज मिळण्यासाठी त्यांच्याकडून मुदत मागण्यात आली होती. आज पुन्हा पाचही नगरसेवक त्यांच्या वकिलांसह न्यायालयात हजर होते. तक्रारदारांतर्फे संबधीतांना दस्तऐवजांच्या प्रती न्यायालया समक्ष पुरवण्यात आल्या असून अभ्यासा करीता त्यांच्याकडून पुन्हा वेळ मागून घेण्यात आली आहे. न्या. जे. जी. पवार यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्या. पवार यांनी पुढील कामकाजासाठी 10 डिसेंबर तारीख दिली आहे.