नगरसेवक खून प्रकरणी चौघेजण ताब्यात

0

मंगळवारी दुपारी वडमुखवाडीजवळ कोयत्याने केले होते वार 

पिंपरी चिंचवड : आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येप्रकरणी दिघी पोलिसांनी चौघांना पहाटे ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. ताब्यात घेतलेल्यात अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, पुणे) याच्यासह प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने यांचा समावेश आहे.

मावसभावानेच दिली होती धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीमध्ये आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात कांबळे यांचा मावस भाऊ संतोष माने याने त्यांच्याशी शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली होती. भांडणानंतर वारंवार मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्यानेच कांबळे यांचा खून केल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे खून प्रकरण?
नगरसेवक कांबळे मागील दोन वर्षांपासून भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करतात. आळंदी परिसरात त्यांची चार-पाच ठिकाणी कामे सुरू आहेत. कामानिमित्त ते मित्रासोबत भोसरीला आले. तिथून पुण्यात कॅबने पुण्याला गेले. पुण्यातून परत भोसरीला आले आणि मित्राच्या दुचाकीवरून परत आळंदीला निघाले. पुणे-आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी जवळील साई मंदिराजवळ आले असता, मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. डोक्यात सहा वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी कांबळे यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.