जाहिरात एजन्सी चालकाची सांगवी पोलिसांत धाव
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी 50 हजारांची रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार जाहिरात एजन्सी चालक एकुमसिंग कोहली यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच नगरसेवक कामठे यांच्याकडून आपल्याला व आपल्या कामागारांच्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.22) कामठे यांनी कोहली यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सांगवी ठाण्यात दिली होती.
रस्त्यात अडवून 50 हजार मागितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहली यांची कोहली अॅडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. त्यांनी भाजप नगरसेवक कामठे यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दिली आहे. त्यात कामठे यांनी 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप कोहली यांनी केला आहे. कामठे यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवून गाडीची चावी काढून घेतली. तसेच कामठे यांच्यापासून आपल्याला व आपल्या कामागारांच्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील कोहली यांनी केली आहे. दरम्यान, शहरातील अनधिकृत पोस्टर्सविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी कोहली कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार नगरसेवक कामठे यांनी 22 फेब्रुवारीला सांगवी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच त्यांनी देखील संरक्षणाची मागणी केली होती.