पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा निर्णय बुलडाणा जिल्हा जातपडताळणी समितीने दिला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि.28) स्थगिती दिली आहे. त्यामुळे गायकवाड यांना तूर्त दिलासा मिळाला असून, त्यांचे नगरसेवकपद कायम आहे. गायकवाड हे भोसरीचे आ. महेशदादा लांडगे यांचे कट्टरसमर्थक आहेत. त्यांना आ. लांडगे यांच्या कोट्यातून भाजपचे तिकीट मिळाले होते. त्यांचे पद रद्द झाले तर आ. लांडगे यांना मोठा झटका बसणार आहे.
कैकाडी जातप्रमाणापत्रावरून गोंधळ
महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुंदन गायकवाड यांनी चिखली प्रभाग क्रमांक ‘एक-अ’ या राखीव जागेवर निवडणूक लढविली होती. ती जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती. त्यांनी कैकाडी जातीचे जातप्रमाणपत्र दाखल केले होते. निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये म्हणजे 22 ऑगस्टपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करता येणार नसल्याने नगरसेवक गायकवाड यांनी नागपूर खंडपीठाकडून 1 सप्टेंबर 2017पर्यंत स्थगिती आदेश आणला होता.
आयुक्तांचा तो आदेश आता रद्द
दरम्यान, बुलडाणा जिल्हा जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने नगरसेवक गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवत ते अनुसूचित जातीत मोडत नसल्याचा निकाल मंगळवारी (दि.22) दिला. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व बाबी तपासून गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यानंतर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने बुलडाणा जिल्हा जातपडताळणी समितीच्या निर्णयाला 7 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश रद्द झाला आहे. त्यामुळे गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम आहे.