जातवैधता प्रमाणापत्र प्रकरण
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे चिखली प्रभाग क्रमांक एक अ चे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यावर 30 जूनला सुनावणीची तारीख आहे. तोपर्यंत यासंदर्भात पालिकेच्या निवडणूक विभागास कोणताही निर्णय घेता येणार नाही.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 ला झाली. निवडणूकीनंतर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये एससी व एसटी या राखीव गटांतून विजयी उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. मात्र, विविध कारणांमुळे अद्याप नगरसेवक गायकवाड व नगरसेविका यशोदा बोईनवाड यांनी मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर केलेले नाही.
न्यायालयात याचिका प्रलंबीत
त्या दोघांचे जातवैधता प्रमाणपत्र उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. नगरसेवक गायकवाड यांनी 24 ऑगस्ट 2017 ला न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर वेळोवेळी सुनावणी झाली. मागील तारीख 22 फेब्रुवारी 2018 होती. पुढील तारीख 30 जूनला आहे. त्यावर न्यायमुर्ती वसंत नाईक व ए. डी. उपाध्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत पालिका निवडणूक विभागास कोणातीही कारवाई करता येणार नाही. या संदर्भात नगरसेवक गायकवाड म्हणाले की, माझे जातवैधता प्रमाणपत्र खरे आहे. त्यासंदर्भात विनाकारण बिनबुडाच्या तक्रारी केल्या जात आहेत. न्यायालयाच्या सुनावणीत सत्य समोर येईल.