पुणे-पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर हे जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी मागील काही महिन्यापासून अटकेत आहेत. या प्रकरणाचा तपास चालू असतानाच आता कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विक्री करून यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मानकर यांच्यासह साधना वर्तक, मुकुंद माधवराव दीक्षित यांचाही समावेश आहे.
आदिती दीक्षित यांच्या शिवाजीनगर, पिंपरी वाघिरे, साधू वासवानी चौकातील जागेची बनावट कागदपत्रे तयार करून त्याची विक्री करण्यात आली. या जमीन विक्रीतून मिळालेले कोट्यवधी रुपये दीपक मानकर, साधना वर्तक आणि मुकुंद दीक्षित यांनी घेतले. ही जागा आपल्या मालकीची असताना त्या जागेच्या विक्रीतून मिळालेले पैसे आपल्याला देण्यात आले नाहीत अशी तक्रार आदिती दीक्षित यांनी दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकरणामुळे दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे चित्र आहे.