भुसावळ : सामाजिक सेवेचा वसा जोपासलेल्या नगरसेवक पिंटू कोठारी यांनी प्रभागातील नागरीकांसाठी घंटागाडी सुरू केली आहे. अटल योजनेत भुसावळचा समावेश झाल्याने शहर स्वच्छ व सुंदर होण्याच्या दृष्टीने पालिकेने कंबर कसली आहे तर नागरीकांनी स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून प्रभागातील नगरसेवक या नात्याने व कर्तव्याप्रती जाण ठेवून नगरसेवक कोठारी यांनी घंटागाडी सुरू केल्याने नागरीकांची मोठी सोय झाली आहे. नागरीकांनी कचरा रस्त्यावर वा गटारीत न फेकता घंटागाडीत टाकावा, असे आवाहन नगरसेवक कोठारी यांनी केले आहे.
साथी हाथ बढाना गीतातून भावनात्मक साद
प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी घंटागाडीवर ध्वनीक्षेपक लावून ‘साथी हाथ बढाना’ या गीतातून नागरीकांना भावनात्मक साद घालण्यात आली आहे. रस्त्यावर वा गटारीत कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा, असे आवाहन गीतातून करण्यात आले आहे. साडेसहा मिनिटांच्या या गीतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्रही ध्वनीमुद्रीत करण्यात आल्याने प्रभागातील नागरीकांनी या उपक्रमाला तेव्हढीच साद दिली आहे.