वैष्णोदेवीला जाताना भाविकांच्या वाहनाला अपघात ; 14 प्रवासी जखमी
भुसावळ- वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार्या भुसावळसह जामनेरच्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला अवजड ट्रेलरने धडक दिल्याने भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू ओढवल्याची तर 14 प्रवासी जखमी झाल्याची घटना राजस्थानमधील थांवला पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताचे वृत्त भुसावळात धडकताच हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या अपघातात सुजीत रमेश कोठारी (45) यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी असून इतरांना मुका मार लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
ट्रेलर रीव्हर्स आल्याने अपघात
भुसावळचे नगरसेवक कोठारी यांच्या बंधूंसह त्यांच्या जामनेरस्थित भगिनी तसेच भाचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य भुसावळहून वैष्णादेवीच्या दर्शनासाठी जात असताना राजस्थानमधील थांवला पोलिस ठाणे हद्दीत अपघात झाला. चढावावरील ट्रेलर मागे आल्याने तो टेम्पो ट्रॅव्हलरला धडकल्याने वाहनातील प्रवासी जखमी झाले. भाविकांनी सुरुवातीला कुलदैवत अंबाजी मंदिराचे दर्शन केल्यानंतर ज्योतपूरजवळील मंदिरात दर्शन घेतले तसेच पुष्करला मुक्कामाला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सुजीत रमेश कोठारी (वय 45) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तीन महिला व दोन पुरूष जखमी आहे. त्यांच्यावर अजमेर येथील व्हीक्टोरीया हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. या अपघातात सारीका शुभम छाजेड (29, रा.जामनेर) व साक्षी सुजीत कोठारी (20) हे गंभीर जखमी असून शुभम छाजेड, मंजुषा अजीत कोठारी (वय 17) व यश अजीत कोठारी यांना मुका मार लागल्याचे समजते. दरम्यान, अपघाताच्या वृत्तानंतर अजमेर येथील तेरापंथी समाजाच्या पदाधिकार्यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालक अकबर पटेल हा देखील जखमी झाला आहे.
नगरसेवक कोठारींसह निमाणी परीवार रवाना
अजमेरजवळ अपघात झाल्याचे वृत्त कळताच नगरसेवक निर्मल कोठारी, रवींद्र निमाणी हे शुक्रवारी पहाटेच अजमेरकडे रवाना झाले. दरम्यान, सुजीत कोठारी यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी उशिरा शहरात आणला जाण्याची शक्यता असून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे समजते.