लोणावळा – कुणबी या जातीच्या दाखल्यावर लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक लढविलेले भाजपचे नगरसेवक व सत्ताधारी पक्षाचे गटनेते भरत मारुती हारपुडे यांनी जात पडताळणी समितीच्या व उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मिळविलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्याने हारपुडे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
हारपुडे यांनी लोणावळा नगरपरिषदेची डिसेंबर 2016 मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक कुणबी या जातीच्या दाखल्यावर लढवली होती. विजयी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र, जात पडताळणी समितीने हारपुडे यांनी सादर केलेला जातीचा दाखला बोगस असल्याचा ठपका ठेवल्याने हारपुडे यांचे पद धोक्यात आले होते.
समितीच्या या निर्णया विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात स्थगिती घेतली होती. न्यायालयाच्या सुनावणीनंतर ती स्थगिती उठल्याने हारपुडे यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती घेतली होती. मात्र, ती देखील उठविण्यात आल्याने हारपुडे यांचे पद धोक्यात आले आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.