पुणे । शहराच्या पर्यावरणाच्या सद्यस्थिती अहवालाची मागणी करणार्या नगरसेवकांनीच या सादरीकरणाला हरताळ फसला. हाताच्या बोटावर मोजण्याएवढे नगरसेवक सोडले, तर मुख्यसभेत उपस्थित बहुतांश नगरसेवक हे मोबाइल आणि गप्पांमध्ये रंगले होते. त्यामुळे या अहवालाचे सादरीकरण अवघ्या 20 मिनिटांमध्ये आटोपण्यात आले. विशेष म्हणजे, एक ते दोन नगरसेवकांनीच या सादरीकरणावर प्रश्न विचारले. मात्र, सभा तहकूब करावयाची असल्याने त्यांनाही बसविण्यात आले.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी 30 जुलैपूर्वी शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला जातो. तो अहवाल मुख्यसभेसमोर ठेवला जातो. यात शहरातील प्रदूषण, पाऊस, वाहनांची संख्या, पूरस्थिती तसेच इतर घटकांची मांडणी केली जाते. यावर्षी महापालिकेच्या सभागृहात बरेच सदस्य नवीन असल्याने या अहवालाचे सादरीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांनंतर त्याचे सादरीकरण पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी केले.
नगरसेवक उदासीन
मात्र, काही मोजक्याच नगरसेवकांनी या अहवालाचे सादरीकरण पाहिले तर बाकी सर्व नगरसेवक एकमेकांसोबत गप्पा-मारणे, मोबाईलवर बोलणे तसेच मोबाईल पाहण्यात गर्क असल्याचे दिसून आले. या सादरीकरणानंतर नगरसेवक सुभाष जगताप, अविनाश बागवे तसेच गोपाळ चिंतल यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी केवळ सादरीकरण ठेवण्यात आले असून चर्चानंतर करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाविषयी नगरसेवकांची असलेली उदासीनता पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आली आहे.