नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यास यश : पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी
पिंपरी चिंचवड ः पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याबाबतच्या कामाची महापालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील कित्येक वर्ष रखडलेल्या पिंपरीवाघेरे गाव ते पिंपळेसौदागर दरम्यानच्या नदीवरील समांतर पुलाचे काम मार्गी लागणार आहे. स्थापत्य विभागामार्फत त्याची 12 कोटी 56 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या पुलाच्या कामासंदर्भात तब्बल तीन वर्षांपासून आयुक्त आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सदर काम तात्काळ सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. तसेच सातत्याने यासाठी शासन दरबारीही पाठपुरावा केला होता.
रहदारीमुळे सध्याच्या पुलाची दुरवस्था…
वाघेरे म्हणाले की, गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, काटे पिंपळे या गावांमधील लोकवस्ती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याअनुषंगाने वाहनांची रहदारीमध्येही वाढ झाल्यामुळे या गावांना जोडणारा जुना पूल अपुरा पडत होता. या पुलाचीही दुरवस्था झाली असून पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने वाहन चालवावे लागते. तसेच या पुलावर संध्याकाळच्या वेळी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा मनस्ताप वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता. परंतु, आता लवकरात लवकर सदर समांतर पूल उभारण्यात येईल. त्यामुळे या सर्व समस्या मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर पुलास ६ मीटर X १४’ मीटरच्या प्रेक्षणीय गॅलरी करण्यात येणार आहे. सदरची गॅलरी व पुलाच्या सुशोभिकरणाची संकल्पना नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सुचविलेल्या सुचनेनुसार तयार करण्यात येणार आहे. प्रेक्षक गॅलरी असणारा पिंपरी चिंचवड शहरातील पहिलाच पुल होत आहे. सिंधी समाजातील संत झुलेलाल यांना माननारा मोठा वर्ग नदीतील माशासाठी अन्नदान करत असतो सततच्या रहदारीमुळे या नागरिकांना व प्रेक्षकांना ञास होऊ नये, म्हणून संदीप वाघेरे यांनी सदरचा प्रस्ताव दिला होता.