पुणे । लूटमारीचा बनाव करून महाबळेश्वरच्या पसरणी घाटात औंधयेथील आनंद कांबळे या तरुणाचा खून झाला होता. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी निखिल मळेकर याची राजकीय पार्श्वभूमी समोर आल्याने या प्रकरणाला आणखी वेगळी कलाटणी मिळाली आहे. निखिलने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी तिसर्या क्रमांकाची मते मिळविणारा आणि नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणारा निखिल प्रेमप्रकरणामुळे गोत्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रेमसंबधातून खून झाल्याचे उघड
आनंद कांबळे व दिक्षा हे नवविवाहित जोडपे महाबळेश्वरला फिरायला जात असताना पसरणी घाटात त्यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. त्यात आनंद याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे सुरुवातीला समजले होते. परंतु, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करीत लुटमारीचा फक्त बनाव असून पत्नी दिक्षाच्या प्रेमसंबधातून हा खून झाल्याचे उघडकीस आले. या खून प्रकरणात दिक्षाचा प्रियकर म्हणजेच निखिल मळेकर हा मुख्यआरोपी आहे. दिक्षा व निखिल यांचा प्रेमसंबध असताना दिक्षाचा आनंद याच्याशी विवाह झाला. हा विवाह झाल्यानंतर निखिल व दिक्षा यांनी कारस्थान रचून लुटमारीचा बनाव करून आनंद याचा काटा काढला. हे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
महापालिका निवडणूक लढविली
आरोपी निखिल याची राजकीय बाजू समोर येत असल्याने या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळाली आहे. निखिल याने मागील वर्षी झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढविली आहे. खुल्या जागेसाठी पक्ष व अपक्ष मिळून 14 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अपक्ष असताना निखिल मळेकर याने तिसर्या क्रमांकाची मते मिळविली होती.
गुन्हेगारी कृत्यामुळे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले
नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणारा निखिल खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी असून त्याला वाई पोलिसांनी अटक केली आहे. निखिल मुळचा चिखिलीतील आहे. तो जागा-खरेदी विक्रीचे व्यवसाय करत होता. तसेच, चिखिलीत स्थानिक पुढारी व शहरातील राजकारण्यांशी त्याचा संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हे खून प्रकरणाची शहराच्या राजकीय वर्तुळातही उलटसूलट चर्चा सुरू आहे.