नगरसेविका माया बारणे यांचे औदार्य!

0

पिंपरी-चिंचवड : थेरगावातील भाजपच्या नगरसेविका माया संतोष बारणे यांनी महापालिकेकडून देण्यात येणारे मानधन आणि सर्व भत्त्यांची रक्कम नाकारली आहे. दुर्बल घटकातील नागरिकांना मदत करता यावी, या उद्देशाने बारणे यांनी मानधन व भत्त्यांची रक्कम महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत वर्ग केली आहे. तशा आशयाचे पत्रदेखील त्यांनी महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिले आहे. दरम्यान, माया बारणे यांनी दाखवलेल्या औदार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासली
महापालिका प्रशासनाच्या वतीने नगरसेवकांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन स्वरुपात वेतन व सभा भत्तादेखील दिला जातो. मात्र, नगरसेविका माया बारणे यांनी हे मानधन नाकारले आहे. त्यांना मिळणार्‍या सर्व मानधनाची रक्कम महापौर सहाय्यता निधीत वळती करावी, यासाठी त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महापौर सहाय्यता निधीद्वारे गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते. या निधीत मानधन जमा करण्याचा निर्णय घेऊन बारणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलला आहे.

महापालिकेच्या वतीने मला मिळणार्‍या मानधनाची रक्कम मी महापौर निधीत वळती करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मदत करता यावी, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र आयुक्तांना दिले आहे.
-माया बारणे, नगरसेविका, थेरगाव