नगरसेविका वैशाली म्हात्रेंना ठार मारण्याची दिली धमकी

0

भिवंडी । काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली मनोज म्हात्रे आणि त्यांची मुलगी हर्षदा म्हात्रे या दोघी न्यायालयीन कामासाठी भिवंडी न्यायालयात उपस्थित असताना प्रशांत म्हात्रे याने त्यांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीने धास्तावलेल्या वैशाली म्हात्रे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने या प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी काँग्रेसचे नेते मनोज अनंत म्हात्रे यांची 14 फेब्रुवारी 2017 रोजी राजकीय वादातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नारपोली पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला होता. प्रशांत म्हात्रे याच्यासह 17 जणांना त्यावेळी आरोपी केले होते. प्रशांत म्हात्रे व विश्‍वपाल यांना न्यायालयात आणले होते. त्यावेळी नगरसेविका वैशाली म्हात्रे आणि त्यांची मुलगी हर्षदा म्हात्रे या न्यायालयीन कामकाजासाठी हजर होत्या. प्रशांत म्हात्रे याने त्यांच्याकडे पाहत शिविगाळ केली. आणि मी जामीनावर सुटून आल्यावर तुम्हाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तशी तक्रार नोंदवली आहे.