नगरसेविकेने पतीसह सासुच्या स्थावर मिळकतीची शपथपत्रात दडवली माहिती

0

सारंगधर पाटील यांची प्रांतांकडे तक्रार ; कायदेशीर कारवाईची मागणी

भुसावळ- शहरातील प्रभाग 13 ’अ’ च्या नगरसेविका मंगला संजय आवटे यांनी निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या शपथपत्रात पती संजय आवटे व सासु बेबाबाई आवटे यांच्या नावावर असलेल्या स्थावर मिळकतीविषयी खोटी माहिती माहिती सादर केली, अशी तक्रार सारंगधर महादेव पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे केली आहे. खोटे शपथपत्र हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रांताधिकार्‍यांनी चौकशी करण्याची मागणी
सारंगधर पाटील यांच्या तक्रारीनुसार पालिकेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्यावेळी मंगला आवटे यांनी मालमत्तेसंबंधी शपथपत्र दाखल केले होते. शपथपत्रात त्यांनी जाणीवपूर्वक पती व सासू यांच्या नावावरील स्थावर मिळकती विषयी अपूर्ण व खोटी माहिती सादर केली. याप्रकरणी सारंगधर पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश आपल्याकडे आल्यानंतर आपण पुढील कारवाईसाठी हे प्रकरण मुख्याधिकार्‍यांकडे वर्ग केले आहे मात्र प्रांतांधिकार्‍यांना या प्रकरणात कारवाईचे अधिकार असल्याने त्यांनी चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्याधिकार्‍यांकडील प्रकरण परत बोलावून आपल्या स्थरावरून उचित कारवाई करावी, असेही त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

आरोप तथ्यहिन -मंगला आवटे
शपथपत्रात प्रामाणिकपणे माहिती दिली आहे. तक्रारदारांनी केलेले आरोप तथ्यहिन आहे. कुठल्याही चौकशीला आपण तयार आहोत. आपला न्यायदेवतेवर विश्‍वास असून कुणाच्यातरी सांगण्यावरून तक्रारदार आरोप करीत असल्याचे नगरसेविका मंगला आवटे म्हणाल्या.