फैजपूर। शहरातील तडवीवाडा, ताहानगर मधील नगरसेविका मलक साईमाबी मलक आबीद या वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडून आल्या आहेत मात्र त्या निवडून आल्यानंतर प्रभागात ढूंकूनही पाहत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे नगरसेवकांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पालिकेत जाऊन प्रभागातील नगरसेविकेस घेराव घालणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
प्रभागातील नगरसेविकेचे दुर्लक्ष
प्रभाग क्रमांक एकमधील अपक्ष उमेदवार मलक साईमाबी यांच्यावर तडवी वाडा, ताहानगर भागातील रहिवाशांनी विश्वास ठेवून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. प्रभागात अनेक नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत असून गटारींची साफसफाई होत नाही तसेच अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. पाण्यासाठीदेखील अनेकदा हाल होतात. न्हावी दरवाजाजवळ पुरुषांचे शौचालय असून त्यामधील भांडे पूर्णपणे तुटले आहेत तर त्याची स्वच्छताही होत नाही. गेल्या 9 महिन्यात प्रभागात थातूर-मातूर सुध्दा कामे झालेली नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या भागात कलीमखा मन्यार हे नगरसेवक होते. त्यांनी याठिकाणी जलकुंभ उभारण्यासह अनेक विकासकामे मंजूर करून घेतली. त्यामुळे विद्यमान नगरसेविका साईमाबी यांनीदेखील आपल्या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.