नगराध्यक्षांचे काम हुकूमशाही पद्धतीने; शहर सुधारणा आणि विकास समितीचा आरोप

0
नगराध्यक्ष पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्‍याकडे घेतली धाव
समितीचे आरोप खोटे असल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे सभागृहातील सभेचे कामकाज हुकूमशाही पद्धतीने होत असल्याचा गंभीर आरोप शहर सुधारणा आणि विकास समितीने केला आहे. तसेच त्यांचे नगराध्यक्ष पद रद्द करावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. तर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष आणि जनसेवा विकास समिती व आरपीआयची सत्ता असून चित्रा जगनाडे या भाजप नगराध्यक्षा आहेत. त्यांचे सभागृहातील कामकाज मनमानी असून ते नियमानुसार करीत नसल्याची तक्रार समितीच्या सात सदस्यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकार्‍यांना सादर केली आहे. निवेदनावर समितीचे गटनेते किशोर भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, आनंद भेगडे, नगरसेविका मंगल भेगडे आणि वैशाली दाभाडे यांच्या सह्या आहेत.
कामकाज कायद्यानुसार नाही
नगराध्यक्षा नगरपालिकेचे सभा कामकाज कायद्यानुसार चालवीत नाहीत. नियमांचे पालन केले जात नाही. 10 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मागणी करूनही मागील सभेचा कार्यवृतांत न वाचताच तो कायम केला आहे. कार्यवृतांत वाचल्याने वेळेचा अपव्यय होतो, असे उत्तर सभागृहात नगराध्यक्षांनी दिले आणि पुढील विषय घेण्यास सांगून विषयांचे वाचन न करताच ते सर्व मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमन 1965 चे कलम 81 आणि महाराष्ट्र नगरपालिका सभा कामकाज चालविणे नियम 1966 च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सभागृहात खोटी उत्तरे देणे, चुकीची माहिती देणे, ठरावावर सह्या न करणे, अजेंड्यावर सही न करताच अजेंडा देणे, नियमबाह्य कामकाज करणे, सभेपुढील विषयांची टिपणी न देणे आदी आरोप निवेदनात करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
न्यायालयाचा अवमान केला 
त्यासाठी नगराध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. यासाठी तळेगाव शहर सुधारणा आणि विकास समितीने जिल्हाधिकारी यांना आणखी एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या धोरणानुसार फेरीवाला हक्काचे संरक्षण न करता फेरीवाल्यांना विस्थापित करण्याची कारवाई नगराध्यक्षांनी केली असून न्यायालयाचा अवमान केला आहे. स्वतःच्या पदाचा गैरवापर करून पथारी विक्रेत्यांवर, टपरी धारकांवर अन्याय करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याने नगराध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या की, मी सभागृहात चुकीचे कामकाज केलेले नाही. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभागृहाच्या मान्यतेने, बहुमताने मंजूर केलेले आहेत. तळेगाव शहर सुधारणा आणि विकास समितीने माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही.