भुसावळ। भुसावळचा अस्वच्छ शहरांमध्ये दुसरा क्रमांक आल्यानंतर सत्ताधार्यांसह विरोधकांना अचानक जाग येऊन शहरात दोन्ही गटांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवासस्थानासमोर स्वच्छता करण्यात गेले असता नगराध्यक्षांनी आमच्या भागात कचरा नाही तुम्ही दुसर्या भागात सफाई करा असे सांगितल्यानंतर जगन सोनवणे व नगराध्यक्ष भोळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
हा तर दहा वर्षातील कारनामा
शहरात पालिका प्रशासनातर्फे विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी स्वतंत्रपणे प्रभाग क्रमांक 5 मध्ये साफसफाई केली. यावेळी विरोधी नगरसेवक हे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवास्थानाजवळ सफाई करण्यासाठी आले असता. आमच्या घराजवळ कचरा नाही, तुम्ही दुसरीकडे सफाई करा, हि गेल्या दहा वर्षातील पापे आहेत. असे नगराध्यक्ष भोळे यांनी खोचून बोलताच विरोधी गटातील जगण सोनवणे, गटनेता उल्हास पगारे यांनी देखील बोलण्यास सुरुवात केली. हे तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पुर्ती न झाल्यामुळेच सरकारने तुमच्या माथी अस्वच्छतेचा शिक्का मारला असल्याचे जगन सोनवणे यांनी सांगितले. मात्र काहींनी वाद होऊ नये याकरीता आटोपते घेत दुसर्या परिसरात जाऊन कचरा संकलन सुरु केले.