नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष एकाच घरात!

0

शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँगे्रस पक्षाचे गटनेते भुपेशभाई रसिकलाल पटेल यांचा दणदणीत विजय झाला आहे. स्विकृत नगरसेवक म्हणून युवक काँगे्रस तालुकाध्यक्ष देवेंद्र राजपूत व पिंटू शिरसाठ तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांची निवड झाली आहे. मोठ्या वहिनी व दीर यांच्या रुपाने लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच घरात गेल्याची बाब संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ठरणार आहे. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

भुपेशभाई पटेल यांना 22 मते
लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी 22 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा 29 डिसेंबर रोजी घेण्यात आली. शिरपूर वरवाडे नगर परिषदेत महाराष्ट्र नगरपरिषद / नगरपंचायती / औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 51 अन्वये या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. शासनाच्या नवीन नियमानुसार पहिल्या सर्वसाधारण पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा पहिला मान जयश्रीबेन पटेल यांना मिळाला आहे. सुरुवातीस काँगे्रसचे गटनेते यांनी भारतीय राष्ट्रीय काँगे्रस पक्षातर्फे भुपेशभाई पटेल यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. तसेच भाजपातर्फे राजेंद्र गुलाबसिंग राजपूत यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली. उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडण्यासाठी हात उंचावून मतदान करण्यात आले. यात भुपेशभाई पटेल यांना नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल व सर्व 21 नगरसेवक असे एकूण 22 मते मिळाली. तर राजेंद्र राजपूत यांना भाजपाचे 4 नगरसेवक व 3 अपक्ष नगरसेवक असे एकूण 7 मते मिळाली. किरण दलाल व पप्पू माळी हे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.

काँगे्रसतर्फे पाटील, शिरसाठ, भाजपातर्फे चौधरी स्विकृत
अध्यासी अधिकारी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी भुपेशभाई पटेल यांचा उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे घोषित केले.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँगे्रसतर्फे स्विकृत नगरसेवक म्हणून युवक काँगे्रस तालुकाध्यक्ष देवेंद्र जामसिंग पाटील व संदिप जयराम शिरसाठ यांचे अर्ज आल्याने तसेच भाजपातर्फे बबन रावजी चौधरी यांचा अर्ज आल्याने या तिघांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा नगरपरिषदेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. अध्यासी अधिकारी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, भाईदास भोई यांनी सभेचे कामकाज पाहिले.

अधिकारी व कर्मचारी उपस्थित
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, माजी उपनगराध्यक्षा छाया ईशी, रंजनाबाई सोनवणे, रेखा सोनार, आशा बागुल, नाजीराबी शेख, वैशाली देवरे, मुमताजबी कुरेशी, लक्ष्मीबाई भिल, अरुणा थोरात, हेमलता गवळी, इरफान मिर्झा, हर्षल गिरासे, चंद्रकांत कोळी, सलिम खाटीक, गणेश सावळे, उज्वला अहिरे, चंद्रकला माळी या काँगे्रसच्या नगरसेवकांसह भाजपा गटनेते मोहन पाटील, मोनिका शेटे, हेमंत पाटील, राजेंद्र राजपूत, सुलोचना पाटील, रोहित रंधे, चंदनसिंग राजपूत, तिसर्‍या गटाचे नगरसेवक किरण दलाल व पप्पू माळी, नवनिर्वाचित स्विकृत नगररसेवक भुरा राजपूत, पिंटू शिरसाठ, बबन चौधरी हे सर्व नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगरपरिषदेत काँगे्रसचे 24 नगरसेवक
आता काँगे्रसच्या नगराध्यक्षा यांच्या व्यतिरिक्त काँगे्रसचे 21 नगरसेवक, 2 स्विकृत नगरसेवक असे 24 संख्याबळ काँगे्रसचे आहे. तर भाजपाचे 4 नगरसेवक, 1 स्विकृत नगरसेवक, भाजपा पुरस्कृत 3 नगरसेवक असे एकूण 8 नगरसेवक तसेच तिसरा गट स्थापन केलेले 2 नगरसेवक असे 34 नगरसेवकांचे पक्षनिकाय बलाबल संख्याबळ आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल तसेच स्विकृत नगरसेवक देवेंद्र राजपूत व पिंटू शिरसाठ यांची घोडाबग्गीवर बसवून विजयी मिरवणूक काढण्यात आली. डी.जे.च्या गाण्यांवर काँगे्रसचा झेंडा फडकावत काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला.