अहमदनगर । केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणी कारवाई करण्यात आली. सरकारी कामात अडथळा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण असे गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्याकांडानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही दगडफेक सुरूच होती. पोलिसांच्या वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्याचबरोबर मारेकर्यांच्या अटकेची मागणी करत शिवसैनिकांनी मृतदेह घटनास्थळी ठेवून रस्ता रोको केला होता. रुग्णवाहिकाही थांबवून ठेवली होती. पोलिसांना पंचनामा करण्यासही विरोध करण्यात आला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, गुन्हे दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.