नगर नियोजन खाते होपलेस, भुक्कड; गडकरींचा मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर!

0

पुणे : वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. त्याच्या जोडीला प्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्क्यांनी वाढ झाली, पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटीशिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्याचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारे नगर नियोजन खाते हे ‘होपलेस’ आहे. हे खाते फुकटाला महाग असून, अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही, अशा शब्दांत गडकरी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे, राज्याचे नगरविकास खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. नगर नियोजन खात्याऐवजी बाहेरची संस्था नेमा आणि पुण्याचा विकास करा, असा सल्ला देत, सिंगापूरच्या धर्तीवर नगरविकासाचे नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षाही गडकरींनी व्यक्त केली. शहरातील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

मुळा-मुठेत जलमार्ग, ड्रायपोर्ट उभारू!
कामे करण्यासाठी पैसा ही समस्या नाही. अधिकारीच काम करत नाहीत, ही समस्या आहे, असे सांगतानाच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, असे गडकरी यांनी सांगताच एकच खसखस पिकली. वाहतूक समस्येच्या बाबतीत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. ही समस्या सोडवता येईल. मुळा-मुठा नदीत काम करायला सरकारने ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, जलमार्ग आणि ड्रायपोर्ट बांधून वाहतूक सुरू करता येईल. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल, असे ते म्हणाले. पुणे- सातारा रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले हा काळा डाग आहे. समस्या आहेत. पण त्या सोडवून सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी शरद पवार यांनी गडकरींची तोंडभरून स्तुती केली. गडकरींनी रस्ते विकासात राज्यातच नाही तर देशातही कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा शब्दात पवार यांनी गडकरींवर स्तुतिसुमने उधळली. गडकरींनीही पवारांचे तोंड भरून कौतुक केले होते. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह पुणे-पौड रस्ता आणि बावधान, कोथरूडकडे जाणार्‍या रस्त्यांमुळे चांदणी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चांदणी चौकातील उतारावर झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) पुलाचे काम केले जाणार आहे. मात्र, यासाठी आवश्यक भूसंपादन अद्याप झाली नाही. त्यामुळे हे उद्घाटन झाले पण प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कामाला केव्हा सुरुवात होते, हे पहावे लागणार आहे. याप्रश्नी दैनिक जनशक्तिनेही वारंवार आवाज उठविला होता.

पुण्यासह संबंध महाराष्ट्रावर आमचे लक्ष!
गडकरी म्हणाले, देशातील दहा नद्यांचे जलमार्गात रुपांतर करण्यात येत असून, लवकरच पंतप्रधानांच्याहस्ते याचे उद्घाटन केले जाईल. या धर्तीवर पुण्यातही मुळा-मुठा जलमार्ग विकसित झाल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. देशात वाहतूकीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीही वेगाने विस्तारत आहे. मात्र, या वाढत्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी नवे रस्ते बांधणे शक्य होणार नाही. परिणामी, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. हवेतून चालणारी वाहने, जलमार्ग, पाण्यावरील जहाजे, नद्यांमधील जलमार्ग यांचा वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुणे मेट्रोबाबत बोलताना गडकरी म्हणाले, पुण्यात मेट्रोवरून चर्चा सुरु असून, नागपूरपेक्षाही चांगली मेट्रो पुण्यात निर्माण होणार आहे. कारण, नागपूर येथील आधिकारी आणि कर्मचारीच या मेट्रोचे काम करणार आहेत. गडकरी आणि फडणवीस नागपूरचे आहेत, त्यांचे पुण्याकडे लक्ष नाही अशी चर्चा सतत चालू असते. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून आमच्या दोघांचेही पुण्यासह सबंध महाराष्ट्रावर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून काम करित असल्याचे सांगत त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले, रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गडकरी आणि पवार एकाच व्यासपीठावर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.