नगांव येथे रामनवमीला साईबाबांचा यात्रोत्सव

0

नंदुरबार । तालुक्यातील नगांव येथील साईबाबांचा यात्रोत्सव श्रीराम नवमीला भरविण्यात येत असून त्यादृष्टीने ग्रामस्थांनी तयारी सुरु केली आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा पंचक्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगांव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

यात्रेला 25 वर्षाची परंपरा
दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीला नगांव येथील साईबाबांची यात्रा भरणार आहे. सोमवार 3 एप्रिल रोजी अष्टमीला रात्री 8 वाजता ह.भ.प.प्रा.ज्ञानेश्‍वर महाराज गांगुर्डे यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या दिवशी श्रीराम नवनमीला यात्रेचे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी 5 वाजता साईस्थान, 6.30 वाजता शृंगार आरती, 8 वाजता सत्यनारायण कथा, 10 वाजेपासून महाप्रसाद वाटप कार्यक्रम होईल. रात्री 9 वाजता साईबाबा यांची पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात्रोत्सवासाठी आणि साईबाबांच्या दर्शनासाठी पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात्रेकरुंच्या तसेच यात्रेत येणार्या व्यवसायिकांसाठी ग्रामस्थांतर्फे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून स्व.जयराम (नाना) चिंधा पाटील यांच्या प्रेरणेने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. ही परंपरा अशोक पाटील यांनी सुरु ठेवली असून पंचक्रोशितील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगांव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.