अमळनेर । लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत तालुक्यातील नगाव खुर्द येथील प्रेरणा सुशील बोरसे या राज्यातील पहिल्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच ठरणार असून सर्वच ग्रामपंचायत बिनविरोध निश्चित झाल्याने नगाव राज्यात प्रेरणादायी ठरणार आहे. निवडणुकीत राजकीय पक्षाचे चिन्ह वापरास बंधन आल्याने फक्त गावाच्या विकासासाठी खर्चाला आळा घालून बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी गावाला प्रेरणा मिळाली आणि गावातील सर्व आजी माजी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह प्रतिष्ठित ग्रामस्थांनी सामूहिक बैठक घेतली सर्वानुमते सरपंच म्हणून प्रेरणा बोरसे, उपसरपंच कोकीलाबाई गोसावी, सदस्य तुषार बोरसे, संजय पाटील, प्रज्ञा गोसावी, उज्वला कुंभार, शालीक मोरे, कमलबाई सोनवणे आदींचेच फक्त उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. त्यानुसार आज निवडणूक निर्णय अधिकारी अशोक ठाकरे व सहाय्यक सुधाकर महाजन यांच्याकडे अर्ज दाखल झाले.