नजिब मुल्ला यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मैदानात!

0

नवी मुंबई । कोकण पदवीधर मतदारसंघातील लोकशाही आघाडीचे उमेदवार नजिब मुल्ला या निवडणुकीत जिंकून आमदार बनतील, असा विश्‍वास लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि आरपीआय (कवाडे गट) लोकशाही आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार नजिब मुल्ला यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची एक बैठक रविवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुल्ला यांच्या विजयासाठी कंबर कसून कार्यकर्ते कामाला लागल्याची माहिती लोकनेते नाईक यांनी दिली. लोकनेते नाईक यांनी स्वतः मुल्ला यांच्या प्रचारासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध शहरांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या भाषणात त्यांनी भाजप सरकारवर खरपूस टीका करत देशात भाजपविरोधात वातावरण बनू लागल्याचे सांगितले. देशात आज अघोषित आणीबाणी सुरू आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा अंकुश राहिलेला नाही. या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, अशी टीका केली. भाजपविरोधात देश पातळीवर विरोधी पक्षांची एकजूट होत असून शरद पवार यांच्याकडे त्यादृष्टीने सर्वांच्या नजरा आहे असे सांगून पवार यांची विरोधी पक्षांच्या महाआघाडीत महत्त्वाची भूमिका राहील, असे सूचित केले. मुल्ला यांच्या रूपाने सर्वसामान्य घरातील, उत्तम संस्कार असलेला आणि काम करणारा उमेदवार लोकशाही आघाडीने दिला आहे.

त्यांच्या विजयासाठी नियोजनबद्ध परिश्रम करण्याचे आवाहन लोकनेते नाईक यांनी शेवटी कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी प्रस्ताविक केले. मुल्ला यांच्या विजयासाठी नवी मुंबईत नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या विजयात नवी मुंबईचा महत्त्वाचा वाटा असेल, असे नमूद करून कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यत पोहोचून मुल्ला यांनाच मत का द्यावे, हे पटवून सांगावे, अशी सूचना डॉ. नाईक यांनी केली. काँग्रेसचे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी आपल्या मिश्कील शैलीत भाजपवर कोट्या करत टीकेचे बाण सोडले. भाजपमध्ये ‘डाव’ खरे होत नसतात. राष्ट्रवादीत असताना तेवणारे निरंजन भाजपत गेल्यावर ते निश्तितच विझणार आहे, या वाक्यात त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले निरंजन डावखरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला.

आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना जर भाजप सरकार पेन्शन देणार असेल, तर नोटाबंदीच्या काळात बळी गेलेले आणि नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या लढाईत प्राण गमावलेल्या व्यक्तींनादेखील पेन्शन द्यावे, अशी मागणी भगत यांनी केली. कोकण पदवीधरपासून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आघाडी आगामी लोकसभा, विधानसभा आणि नवी मुंबई पालिकेपर्यंत टिकावी, अशी इच्छा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केली. लोकनेते गणेश नाईक यांच्या सर्वधर्मसमभावाच्या कृतिशील विचारांमुळे आणि विकासकामांमुळे लाभ झालेला सुशिक्षित पदवीधर मतदार मुल्ला यांनाच एकगठ्ठा मतदान करेल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक मुनाफ हकिम यांनी व्यक्त केली. कोकण पदवीधरची निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मानसन्मानासाठी, कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि जिंकण्यासाठीच लढवत असल्याची भावना उमेदवार मुल्ला यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
लोकनेते नाईक पाठीशी खंबीर उभे असून प्रतिकूल परिस्थितीतही विजयाला गवसणी कशी घालायची, याची प्रेरणा त्यांच्यापासून घेतल्याचे मुल्ला म्हणाले. बैठकीचे निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी आभार प्रदर्शन करताना मुल्ला यांच्यामागे लोकनेते नाईक यांचे आशीर्वाद असून नवी मुंबईतून त्यांना मतदानात निश्‍चितच आघाडी मिळवून देऊ, असा विश्‍वास व्यक्त केला. महापौर जयंवत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, सेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारख, युवक काँगे्रसचे लोकसभा अध्यक्ष निशांत भगत आदींसह पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.