नटभैरवपासून… भैरवीपर्यंत सजलेली मैफल

0

पुणे । ‘अब मानले बालमा मोरी बाते’ या नटभैरव रागाने झालेली सुरुवात ‘दे तेरी लकडी,’ ‘तेरे आखियोंने बैर किया’, ‘झुक कर पवन चकोरे’ ‘रामा निंद न आवे’ ही चैती आणि ‘ए मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ही भैरवीतील गझल गाऊन सांगता अशापद्धतीने आग्रा घराण्याच्या नावाजलेल्या ख्याल व ठुमरी गायिका डॉ. संध्या काथवटे यांनी गानमैफल सजवली.

निमित्त होते; डॉ. संध्या काथवटे यांच्या षष्ठ्यब्दिपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या समारंभाचे! ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांच्या हस्ते डॉ. काथवटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काथवटे लिखित ‘पूर्व संध्या माझा सांगितिक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन शशिकांत ताबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुण कशाळकर, शरद साठे, शशिकांत ताबे, पं उल्हास कशाळकर, पं.सुरेश तळवळकर,पं. रामदास पळसुले, पं.अमरेंद्र धनेश्‍वर, नीलाताई भागवत व साधना बॅनर्जी उपस्थित होते.

गोगटे म्हणाल्या, संध्याताईंचे सांगितिक विचार परिपक्व आहेत. त्या अत्यंत बुद्धिवान असून त्यांचे व्यक्तिमत्त्व, दिलखुलासपणा व आत्मविश्‍वास यांमुळे त्या गुरूच्या कोशातून बाहेर पडून आपली कला सादर करतात. पुस्तकाबाबत बोलताना संध्याताई म्हणाल्या, पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संगीताशी जोडल्या गेलेल्या आजवरच्या आय्ाुष्यातील काही महत्त्वाच्या घटना, मनोरंजक गोष्टी आणि एकूण संगीताविषयी माझे विचार यात मांडले आहेत. एकाच पुस्तकात मराठी आणि इंग्रजी आवृत्ती असल्याने अधिक वाचकांना त्याचा लाभ घेता येईल. पं अरविंदकुमार आझाद यांनी तबल्याची तर उमेश पुरोहित यांनी हार्मोनियमची साथ केली. सूत्रसंचालन मृणाल आठल्ये यांनी केले.