पुणे : बरसणार्या श्रावण धारांबरोबर फेर, फुगड्या, झोके असे पारंपरिक खेळ करत नटून-थटून महिलांनी नागाच्या प्रतिकृतीची पूजा करून श्रावणातील पहिला नागपंचमीचा सण गुरुवारी उत्साहात साजरा केला. आधुनिकतेतही परंपरा जपण्याचा केला जाणारा प्रयत्नच यावेळी दिसून आला.
श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी ‘नागपंचमी’ साजरी केली जाते. नागपंचमीनिमित्त नववधू माहेरी येतात. आदल्यादिवशीच हातावर सुरेख मेंदी काढून मोठे झोके बांधून आनंदात महिलांनी सण साजरा केला. कपाळावर अर्धचंद्र, काठाची नऊवारी, गळ्यात ठुशी परिधान करून नागाच्या प्रतिकृतींची पूजा केली. काही ठिकाणी मातीचा नाग तयार केला होता. काहींनी रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढला होता. तर काहींनी घराजवळील वारुळाची पुजा करुन दुध व लाह्या नागदेवतेला वाहल्या. त्याचबरोबर घराघरात पुरण व साखर-खोबर्याची दिंडे हा गोड पदार्थ बनविण्यात आल्या होता. नाग व सापला आपल्या संस्कृतीत देव मानले जाते म्हणून या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिद्ध मानले जाते. कारण या क्रियांनी अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा होण्याची शक्यता मानली जाते. त्यामुळे महिलांनी आदल्या दिवशीच स्वयंपाकाची तयारी करून ठेवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाला. नोकरदार महिलांनीही हा सण आनंदाने साजरा केला. शहरातील काही शाळांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला. सदाशिव पेठेतील मुलांच्या भावे शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी यानिमित्ताने फेर धरून पिंगा घातला.