भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल : सबळ पुराव्याचा अभाव
भुसावळ : शहरातील प्रसिद्ध मल्ल मोहन बारसे यांच्या खून प्रकरणातील दोघा संशयीतांवर भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळ दोघा संशयीतांनी गोळीबार केल्याने नट्टू चावरीया याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल खटल्यात सबळ पुराव्याअभावी व साक्षीदारांच्या जवाबातील तफावतीमुळे संशयाचा फायदा देत माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह नऊ संशयीतांची भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांवर झाला होता गोळीबार
भुसावळातील प्रसिद्ध मल्ल स्व.मोहन बारसे यांची संशयीत आरोपी नट्टू दयाराम चावरीया व गोपाल शिवराम शिंदे (दोन्ही रा.भुसावळ) यांनी 3 जुलै 2015 रोजी शहरातील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाजवळ निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना धुळ्यातील कारागृहात हलवण्यात आले होते. न्यायालयीन तारखेवर त्यांना धुळे-भुसावळ बस (एम.एच.14 बी.टी.4083) द्वारे 13 जानेवारी 2016 रोजी आणले जात असताना नाहाटा महाविद्यालयाजवळ वाहतूक कोंडीमुळे बस थांबली असताना गाडीत आधीपासून बसून असलेला आरोपी अमित परीहार याने दोघा आरोपींवर गोळीबार करताच एक गोळी नट्टू चावरीयाच्या डाव्या बाजूला छातीला लागली होती तर आरोपीने पोलिसांवर कट्टा रोखून सागर मदन बारसेसह बसमधून पळ काढला होता. गोळीबारात चावरीया यास जळगावात हलवल्यानंतर त्याचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी दोघा आरोपींसह अन्य सात आरोपींविरुद्ध एएसआय अंकुश भालचंद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार खुनासह विविध कलमान्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
22 साक्षीदारांचे नोंदवले जवाब
नट्टू चावरीया खून खटल्यात तब्बल 22 साक्षीदारांचे जवाब नोंदवण्यात आले तर तब्बल चार वर्ष या खटल्याचे कामकाज चालले. साक्षीदारांच्या जवाबातील तफावत तसेच संशयाचा फायदा देत सर्व संशयीतांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात तपासाधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांनी काम पाहिले.
या आरोपींची निर्दोष मुक्तता
या खटल्यात अमित नारायणसिंह परीहार (22, नागसेन कॉलनी, कंडारी), सागर मदन बारसे (28, वाल्मीक नगर, भुसावळ, ह.मु.सांगवी, ता.यावल), माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, दीपक मोहन बारसे, जितेंद्र उर्फ पापा मोहन बारसे, मिथुन मोहन बारसे, धीरज उर्फ भुर्या किशोर बारसे, किशोर हिरामण उर्फ गोजोर्या सखरू जाधव, पिद्या उर्फ आकाश शाम जाधव (सर्व रा.भुसावळ) या सर्व संशयीतांची न्या.एस.पी.डोरले यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड.अकिल ईस्माईल, अॅड.मनीष सेवलानी, अॅड.प्रफुल्ल पाटील व अॅड.चरणजितसिंग यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे अॅड.पी.बी.भोंबे यांनी काम पाहिले.