तक्रारीनंतर प्रत्यक्ष जाऊन केली पाहणी; नगरपालिका प्रशासनाला स्वच्छतेसंबंधी दिल्या सूचना
शिरपूर । श हरातील नथ्थूनगर भागात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने तेथील ५० ते ६० महिलांनी दोन दिवसापूर्वी थेट नगरपालिकेत धाव घेतली व भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील यांच्याकडे अस्वच्छतेबद्दल गर्हाणे मांडली. हेमंत पाटील यांनी ताबडतोब अधिकार्यांना सोबत घेवून नथ्थूनगर भागाची पाहणी करुन तेथे असलेल्या दुरावस्थेबाबत अधिकार्यांना जाब विचारला. त्यानंतर या भागातील कामाला सुरुवात झाली. याबद्दल महिलांनी नगरसेवक हेमंत पाटील यांचे आभार मानले. शिरपूर शहरातील नथ्थूनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून शौचालयाची दुरवस्था, डुकरांचा सुळसुळाट, तुंबलेल्या गटारी, ओसंडून वाहणारी कचराकुंडी अशा विविध समस्यांनी त्रस्त महिलांनी दोन दिवसांपुर्वी येथील नगरपालिकेत समस्यांचा पाढा वाचण्यासाठी धाव घेतली त्यावेळी नगरसेवक हेमंत पाटील तेथे उपस्थित असल्याने महिलांनी त्यांच्यापूढे समस्या मांडली.
महिलांची कसरत
नथ्थूनगरमध्ये नुकतेच रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. शौचालयापासून रस्ता दोन फूट वर आहे. खाली उतरण्यासाठी पायर्यांची सोय नाही. त्यामुळे कसरत करतच महिलांना खाली उतरावे लागते. त्यात विशेषतः वृद्ध महिलांची कुचंबणा होते. पाय घसरून अपघात होण्याचीही भीती आहे. शौचालयात पाणी टाकण्यासाठी दोन हौद बांधले आहेत. एक हौद निकामी झाला असून त्यात झाडेझुडुपे उगली आहेत. शौचालयावरील भार पाहता एक हौद अपुरा ठरतो. पाणी टाकण्यासाठी दिलेली भांडीही जागेवर नसल्याचे दिसून येते. गटारी तुंबलेल्या असल्याने मोकळ्या जागेवर सांडपाणी साठल्याने अस्वच्छता पसरली आहे.
जीवाला धोका
सध्या सर्वत्र डेग्यू, मलेरीया, स्वाईन-फ्लूची साथ सुरु आहे. सर्वत्र साथरोग पसल्याचे दिसून येत आहे. नथ्थूनगरमध्ये पसलेल्या अस्वच्छतेमुळे साथरोग पसरण्यास अधिकच चालना मिळत आहे. महिलांसाठी १३ सीट्सच्या शौचालय बांधकाम झाले आहे. त्यातील पाच सीट्सचे दरवाजे चोरीस गेले आहेत. तीन सीट्सची भांडी तुंबली आहेत. त्यामुळे अवघ्या पाच सीट्स वापरात आहेत.
कमी सिट्स उपलब्ध असल्याने महिलांना तासभर ताटकळत राहावे लागते. नाईलाजास्तव महिलांना उघड्यावर शौचविधीस भाग पडते.
केवळ नथ्थूनगरच नव्हे तर शहरातील सर्वच वस्त्यांत पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे. शौचालयासारख्या गरजांसाठी महिलांना रस्त्यावर यावे लागते ही बाब पालिकेला शोभणीय नाही. असे घाणीचे साम्राज्य शहरात कोणत्याही ठिकाणी असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. – हेमंत पाटील, नगरसेवक
स्वच्छता ठेवणे हे पालिकेचे कर्तव्यच आहे. नथ्थूनगरमध्ये तातडीने सफाई सुरू केली आहे. मात्र केरकचरा होऊ नये यासाठी नागरिकांनीही दक्षता घ्यावी. शौचालयात पुरेसे पाणी टाकावे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेवावी. स्वच्छतेसाठी नागरीकांनी देखील न.पा. ला सहकार्य करावे असे आवाहन केले. – बांधकाम अभियंता सोनवणे, अभियंता, शिरपूर पालिका