पक्षी निरीक्षणाचीही मिळाली आयती संधी
चिंचवड : चिमुकल्यांना नदीकाठावर बसून गोष्टी ऐकण्याचा आनंद घेता यावा, त्यांना नदीकाठावर येणारे विविध पक्षी पाहता यावेत, या उद्देशाने जीवित नदी पर्यावरण संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत ‘नदीकाठच्या गोष्टीचा आनंद’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे शंभरच्या जवळपास मुले व त्यांचे पालक चिंचवड येथील मोरया गोसावी घाटावर गोष्टी ऐकण्यासाठी जमले होते.
पालकांनीही अनुभवले अनोखे विश्व
जमलेली मुले व त्यांच्या पालकांनी पहिल्या सत्रात नदीकाठावर आलेले सुमारे 15 जातीचे पक्षी पाहिले. तर दुसर्या सत्रात त्यांनी पर्यावरणाशी निगडीत एक गोष्ट ऐकली. हे आगळेवेगळे विश्व मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही अनुभवले. या उपक्रमाबद्दल बोलताना जीवित नदी पर्यावरण संस्थेचे धर्मराज पाटील म्हणाले की, जीवित नदी उपक्रमांतर्गत नागरिकांना नदीच्या सानिध्यात आणणे हा आमचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवड्यातून एकदा नदीकिनारी
नदी किनारा दत्तक घेणे, स्थानिकांच्या मदतीने या नदी किनार्यावर आठवड्यातून एकदा जाणे, तिथे स्वच्छता करणे, पर्यावरणाशी निगडीत विषयांवर डॉक्युमेंट्री तयार करणे, असे निरनिराळे उपक्रम राबवले जातात. नदी किनार्यावर प्रदर्शनही भरवले जाते. या उपक्रमांमुळे मुले व त्यांच्या पालकांना येतात स्वच्छ व शांत नदी किनारा अनुभवता येतो, असेही धर्मराज पाटील यांनी सांगितले