पिंपरी-चिंचवड : नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. नदीवर स्वच्छतेवर प्रत्येकाने लक्ष केंद्रीत करायला हवे. नदीचे महत्व हे विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे. नदी स्वच्छतेबाबतचे असे स्तुत्य उपक्रम राबविले जावे, असे मत देहुतील रानजाई प्रकल्पाचे संस्थापक सोमनाथ मुसुडगे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत पवनामाई जलमैत्री अभियान रविवारी चिंचवड येथे राबविण्यात आले. अभियानास सर्वसामान्य नागरिक ते राजकीय यांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी एसीएमआरचे डॉ. अभय कुलकर्णी, पत्रकार अविनाश चिलेकर, कलांजन सेटचे मनोज फुटाणे, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
पाण्याशी मैत्री करा
मसुगडे म्हणाले, आजच्या नदीचे चित्र व सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे चित्र याच जमीनअस्माना इतका फरक आहे. ज्या नदीस आपण माता, आई म्हणतो ती आता आजारी झाली आहे. तिच्या या कारणास आपली पिढीच कारणीभूत आहे. आज गावोगावच्या नद्या सांडपाण्याच्या गटारी झालेल्या दिसतात. पाण्याविषयी भक्ती, पाण्याशी मैत्री या वाक्याने बर्याच संस्था तसेच महत्वाच्या व्यक्ति पवना जलमैत्री अभियानामध्ये बांधल्या गेल्या. आपला कचरा दुसर्याच्या दारात उचलण्याचे काम आपण करायचे नाही.
नद्या झाल्या नाले
साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यकंटराव भताने म्हणाले, एके काळी पिंपरी-चिंचवड शहर प्रसिध्द, पण आज मात्र त्याची ओळख कचर्याचे शहर म्हणून शिल्लक राहिली आहे. हा सर्व कचरा आता सुंदर नद्यांना विद्रुप करत आहे. ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. आज मात्र या सर्व नद्यांना नाल्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे व त्यातून सतत आम्लयुक्त पाणी वाहतांना दिसते. याचा परिणाम निव्वळ जनतेच्या आरोग्यावर झालेला नसून नद्यांचे आरोग्यही त्यामुळे धोक्यात आले आहे.
नदीचे महत्ववर मनोगत
डॉ. विश्वास येवले यांच्या मार्गदर्शऩाखाली पवनामाई जलमैत्री अभियानास सुरुवात झाली. यावेळी नेहा नांदगावकर, अमोल दामले या युवापिढीनेही नदीबाबतचे महत्व सांगितले. प्रदीप वाल्हेकर, पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण लडकत, राजीव भावसार , सावरकर मित्र मंडळातर्फे अनील खैरे व भास्कर रिकामे व ज्ञानप्रबोधीनीचे ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते. पाणी माझे जीवन, सारे जलस्त्रोत माझे तीर्थक्षेत्र आहे ही प्रतिज्ञा घेऊन अभियानाची सांगता करण्यात आली. आभार सुनील घाडगे यांनी मानले.