वाळूमाफियांचा गोरख धंदा तेजीत
वडगाव मावळः सगळ्या पदार्थांमध्ये मिलावट केल्याचे वाचत असतो. मात्र नदीतून काढल्या जाणार्या वाळूमध्येही जर मिलावट होत असेल, यावर विश्वास नाही बसणार. मात्र मावळ परिसरामध्ये नदीच्या वाळूत क्रश सॅण्ड मिसळून वाळू विकण्याचा धंदा जोरात सुरू आहे. महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही. बांधकामाच्या स्लॅप व प्लास्टरच्या मजबुतीसाठी एकमेव पर्याय म्हणून वाळूकडे पहिले जात आहे. नदीच्या वाळूमध्ये क्रश सॅण्ड मिसळून वाढीव किंमतीने ही वाळू विकण्याचा धंदा सुरू आहेत. यातून ग्राहकांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे. नदीच्या वाळूत भेसळ करून वाळू विकणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाढत्या नागरिकीकरणाचा परिणाम
पुणे-मुंबई या दोन महानगरच्या मध्यभागी मावळ तालुका आहे. नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत चालल्याने घर, इमारत बांधण्यावर लोकांचा जास्त कल असलेला दिसून येत आहे. यात टोलेजंग गृहप्रकल्प तसेच घराचे बांधकाम सुरू असून, बांधकामाच्या स्लॅप व प्लास्टरच्या मजबुतीसाठी एकमेव वाळू आहे. पण वाळू उपसा लीलाव बंदीमुळे तसेच महसूल विभागाच्या कारवाईच्या धास्तीने वाळूचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. काही व्यक्तींना वाळू मिळत नसल्याने त्यांचे स्लॅप व प्लास्टर अपूर्ण आहे. वाळूचा शोध घेताना नदीची वाळू आहे; पण ती 8 हजार 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत एक ब्रॉस मिळते. पण त्या वाळूत वाळू माफिया क्रश सॅण्ड मिसळून निकृष्ट दर्जाची वाळू विकत आहेत.
कमी पैशात जास्त फायदा
अहिरवडे (ता. मावळ) येथून दोन हजार 400 रुपये एक ब्रॉस क्रश सॅण्ड घेऊन जात एका वाळूच्या गाडीत मिसळून ती गाडी हजारो रुपयांना विकली जाते. भेसळ केलेली वाळू ही कामासाठी निकृष्ट दर्जाची असते. ग्राहकांची लूट केली जात आहे. तरी महसूल विभागाने अशा वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ज्या स्टोन क्रशरवर मांजर्या दगडाची क्रश सॅण्ड मिळत्या ठिकाणी हे वाळूमाफिया वाढीव किमंतीने ती वाळूसारखी दिसणारी क्रश सॅण्ड विकत घेतात. ही क्रश सॅण्ड विकत घेण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. महसूल विभाग स्थानिक वाळूंच्या वाहनांवर कारवाई करून लाखोंचा दंड वसूल करतात. तर हप्ते देणार्या वाळू व माती वाहतूक करणारी वाहने सोडली जातात.