नदीपात्रातील बांधकामांवर लवकरच हातोडा

0

पुणे ।राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या मुठा नदीपात्रातील पुररेषेत येणार्‍या बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार असून त्यासाठी फक्त आयुक्त कुणालकुमार यांची मंजुरी बाकी आहे. सर्व यंत्रणा तयार असूनही फक्त आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करून पाच दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

डीपी रस्त्यावरील नदीलगतच्या पुररेषेत येणार्‍या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिका आणि पाटंबधारे विभागाला दिले आहेत. एनजीटीच्या आदेशानंतर महापालिका आणि पाटंबधारे यांच्याकडून एकत्रितरित्या या भागातील नदीपात्रातील पुररेषेत येणार्‍या बांधकामांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले होते. जवळपास आठ दिवसांच्या कालावधीनंतर मागील आठवड्यात गुरूवारी सकाळी या सर्व्हेक्षणाचे काम संपले. त्यानुसार या डीपी रस्त्यालगतच्या पूररेषेत 30 अनधिकृत बांधकामे आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर लगेचच कारवाईस सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, सर्व्हेक्षणाला पाच दिवस उलटूनही पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईसाठी आयुक्तांची मंजुरीची आवश्यकता आहे. त्यासंबधीचे निवेदन अतिरिक्त आयुक्तांमार्फ मान्यतेसाठी ठेवण्यात आला होते. त्यावर अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची सोमवारी मंजुरी मिळाली, त्यानंतर आता आयुक्त कुणाल कुमार यांच्यापुढे मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

पोलिसांसह इतर विभागही सज्ज
या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त लागणार आहे. प्रशासनाने तशी मागणी या विभागाकडे केली असून आता पोलिसांकडूनच कधी बंदोबस्त हवा आहे याची विचारणा केली जात आहे. याशिवाय पालिकेचे व्हेईकल डेपोसह अन्य विभागही कारवाईसाठी सज्ज आहेत. आता केवळ आयुक्तांच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.