राज ठाकरे यांनी मांडला आराखडा : सीएसआर योजनेतून पैसे उभारावेत
पुणे – मुळा-मुठा नदीवर बालगंधर्व ते म्हात्रे पूलापर्यंत नदीपात्र विकसनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील कंपन्यांकडून सीएसआर योजनेतून पैसे उभे करता येतील. नदीपात्र विकसनाचा हा प्रकल्प तब्बल 840 कोटींचा असून त्यातून दरवर्षी तीन कोटींचा महसूल मिळणार आहे. यामध्ये फुलराणी, आखीव-रेखीव संभाजी बाग, नदीपात्रात सोडले जाणारे मैलापाणी रोखणे आदी उपाययोजना करता येतील, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
गोदापार्कच्या धर्तीवर सुधारणा राबवणार
नाशिकमधील गोदापार्कच्या धर्तीवर पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकास संकल्पनेचे सादरीकरण मंगळवारी राज ठाकरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, चित्रपटांप्रमाणे नाटकांसाठीही मल्टिप्लेक्स उभे करण्याचा मानस आहे. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येकी हजार क्षमतेचे पाच नाट्यगृह, 5000 आसनक्षमतेचे एक ओपन थिएटर, 100 ते 200 आसनक्षमतेचे प्रायोगिक रंगकर्मींसाठी थिएटर अशा अद्ययावत सुविधा असतील.
यासाठी पुणे मुंबईतील अनेक उद्योजक सहकार्यास तयार आहेत. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने ट्रस्ट स्थापन करून त्यामध्ये पुण्यातील तज्ञ लोकांचा समावेश करावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.