अमळनेर। तालुक्यातील गंगापुरी येथील दोन युवक बैलांना तापी नदीवर पाणी पाजण्यासाठी गेलेले असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण बैलजोडी व गाडीसह पाण्यात बुडत होते. मात्र दोन्ही तरुणांना वेळेवर मदत मिळाल्याने दोघांचे प्राण वाचले परंतु दोघ बैलांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना 20 रोजी घडली. तालुक्यातील गंगापुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण पाटील (35), सचिन मिलिंद पाटील (17) हे दोघेही बैलगाडी घेवून शेतात जात असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी तापी नदी काठावर बैलगाडीसह गेले. अचानक बैल पाण्यात पडले. त्याठिकाणी डोह असल्यामुळे बैलगाडीसह दोघेही तरुण पाण्यात पडले.
तरूणांनी काठीच्या मदतीने दिला दोघांना आधार
तरुणही वाचण्यासाठी पाण्यात हातपाय हलवून आरडाओरड करु लागले. ही घटना पलीकडच्या काठावरील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील ग्रामस्थांनाही दिसली. जवळच असणार्या मनोहर धनराज कोळी या मुलाला हे दृश्य दिसताच क्षणात त्याने कपडे काढून पाण्यात उडी मारली. मात्र बुडणार्या तरूणांपर्यंत पोहचण्यासाठी त्याचे धाडस होत नव्हते. सुदैवाने त्याचवेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील तेथून वाहनाने जात होते. त्यांना तरूणांची आरडाओरड ऐकू आल्याने तेही वाहन थांबवून घटनास्थळाकडे धावले. परिस्थिती गंभीर पाहून त्यांनी जवळच दोन काठ्या शोधल्या. एक काठी मनोहरच्या हातात देवून बुडत्यांना आधार दिला व एक काठी मनोहर व त्यांच्यात स्वत:मध्ये आधार म्हणून धरली आणि एकमेकांमध्ये समन्वय साधून बुडणार्या दोघही तरुणांना बाहेर काढण्यात आले. मनोहर कोळी व मिलिंद पाटील यांच्या सतर्कतेमुळे ज्ञानेश्वर पाटील व सचिन पाटील हे दोघेही वाचले. मात्र बैल गाडीला जुंपलेले असल्याने, बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.