नदी खोलीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार : नगराध्यक्ष सुनील काळे

0

भोगावती नदी खोलीकरणासाठी अधिकार्‍यांनी केली पाहणी

वरणगाव- भोगावती नदीच्या खोलीकरणाची मागणी 19 मे रोजी डॉ. राजेंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी नदी खोलीकरण व सुशोभीकरणाचा प्रस्तावही देण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नदी खोलीकरण हे ‘नही’च्या माध्यमातून करून देतो, असे आश्‍वासन देवून अधिकार्‍यांना आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी ‘नही’च्या अधिकार्‍यांनी भोगावती नदीची पाहणी केली.

मातीचे बंधारे बांधण्याची मागणी
भोगावती नदीच्या पुनर्जीवनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. यासाठी ठिकठिकाणी मातीचे बंधारे ठेवण्याची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अधिकार्‍यांकडे केली. यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी तसेच संजीव कोलते, कार्यालयीन अधीक्षक गंभीर कोळी, बांधकाम विभागाचे राजेंद्र गायकवाड, इरफान पिंजारी, कामगार नेते मिलिंद मेढे, माजी उपसरपंच साजिद कुरेशी उपस्थित होते.

गौण खनिज माफीचा प्रस्ताव
मातीची रॉयल्टी माफ करण्याच्या सूचना त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या माध्यमातून रॉयल्टी माफीचा प्रस्ताव दिला होता. याची जिल्हाधिकारी निबाळकर यांनी दखल घेवून ‘नही’चे कॉर्डीनेटर सोनवणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म अधिकारी दीपक जाधव यांनी बुधवारी नगरपालिकेतील आवश्यक असलेल्या कागद पत्रासह भोगावती नदीची पाहणी केली.