पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नदी वाचवा-जीवन वाचवा हा संदेश देण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले होते. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 500 पेक्षा जास्त विविध शाळांचे विद्यार्थी व सायकलप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथून आज दुपारी तीन वाजता ही फेरी सुरु झाली.
आकुर्डी ते चिंचवड मार्ग
देहूरोड बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ.पी. वैष्णव यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी एस.बी.पाटील, सदाशिव रिकामे, विनोद बन्सल, मिलिंद देशपांडे व्यासपीठावरून सायकलस्वारांना उत्तेजन देत होते. ही रॅली आकुर्डी रेल्वे स्टेशन, संभाजी चौकातून पवना नदी घाट चिंचवड येथे आल्यानंतर पर्यावरण संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, दिगंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.
पाणी रक्षणाची घेतली शपथ
या ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांसोबत पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पाणी हे जीवन आहे अशी शपथ घेतली. मोरया मंदिराजवळ गांधीपेठ मित्र मंडळ, धनेश्वर मंदिर ट्रस्ट व शिववंदना परिवाराने राजगिरा लाडू व सरबत देऊन रॅलीचे स्वागत केले. या रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदविला. हीच रॅली परत प्रेमलोक पार्क, बिजलीनगर मार्गे परत सावरकर मंडळ असा 15 किमी अंतर पार करुन पोहोचली. संपूर्ण मार्गावर विविध संस्था व महिलांनी झेंडूच्या फुलांनी सायकल स्वारांचे स्वागत केले.
यांनी केले सहकार्य
या रॅलीसाठी पोलीस नागरिक मित्र यांच्यासह विविध संघटनांचे सहकार्य मिळाले. ही रॅली सुरक्षित पार पडण्यासाठी श्रीकांत मापारी, दीपक पंडित, विनीत दाते, संतोष गाढवे यांच्यासह वृक्षवल्ली परिवार व सायकल मित्रांचे सहकार्य मिळाले. रॅलीच्या मार्गावर भास्कर रिकामे व मुक्ता चैतन्य यांनी पर्यावरण विषयक जनजागृती केली.