शहरात दरदिवशी होते 744 एमएलडी सांडपाण्याची निर्मिती; 10 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र
पुणे : शहरातील सांडपाणी थेट नदीत येत असल्याने मुळा- मुठा नदीमधील जैवविविधता नष्ट झाली आहे. असे असतानाच महापालिकेकडून राबविण्यात येणार्या नदी संवर्धन योजनेचे काम नुसतेच कागदावर असल्याने, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून पालिकेची वारंवार कान उघडणी केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडून नदी संवर्धनासाठी अल्पकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नाल्यातील पाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करणे आणि अस्तित्वातील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांवर अतिरिक्त काम करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
महापालिकेच्या कामाबाबत व्यक्त केली नाराजी
यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून पालिकेस अनेकदा दंडही आकारण्यात आलेला असून हे सांडपाणी व्यवस्थापन करण्यात पालिका अपयशी ठरत असल्याने पालिकेच्या कामाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. प्रत्येकवेळी पालिकेकडून या बैठकांमध्ये तसेच एमपीसीबीच्या पत्रांना उत्तरे देताना, सुमारे 995 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार्या नदी संवर्धन योजनेचे काम सुरू असल्याचे पुढे केले जाते. शहरात दरदिवशी सुमारे 744 एमएलडी एवढे सांडपाणी निर्माण होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने 10 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारलेली असून, त्याची क्षमता 567 एमएलडी आहे. मात्र, प्रत्यक्षात ती 40 टक्के क्षमतेनेही चालत नाहीत.
15 ते 20 टक्के ओव्हर लोड
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या नदीमध्ये नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी येते. या पाण्यावर ‘निरी’ या संस्थेच्या माध्यमातून ‘पायथोरीड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी’चा वापर करून नाल्याच्या पाण्यावर प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. या शिवाय, जास्तीत जास्त सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी या उद्देशाने सध्या सुरू असलेल्या सर्व सांडपाणी केंद्रांवर शुद्धीकरणाचा 15 ते 20 टक्के ओव्हर लोड करून चालविण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.