पिंपरी-चिंचवड : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे येथे सुरु झाला आहे. त्याच महोत्सवाचा एक भाग म्हणून चिंचवडगाव येथे आज नदी संवर्धन व स्वच्छता याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेआठ ते साडेदहा दरम्यान मोरया गोसावी मंदिर परिसरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये नदीविषयी रांगोळी प्रदर्शन, नदीविषयी प्रख्यात चित्रकारांचे थेट कला दर्शन व विक्री, नदीकाठी शास्त्रीय संगीताच्या सानिध्यात संगीतमय सकाळ, पवना नदी विषयी यशोगाथा सादर करण्यात आली.
बासरी वादन, लघुपट, चित्रकला
महोत्सवाची सुरुवात राजू यांच्या सुरेल बासरी वादनाने करण्यात आली. तसेच नदी विषयी दोन लघुपट दाखविण्यात आले. त्यानंतर नदी विषयी उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जेएसपीएम या कॉलेजच्या शाश्वत ग्रुपने पर्यावरणाबाबत जनजागृतीव नदी वाचवा बद्दल केलेले कार्य सांगितले. कार्यक्रमात स्थानिक प्रख्यात चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांची विक्री केली. नदीबद्दलच्या आत्मीयतेतून चित्र विक्रीतून आलेला निधी नदी संवर्धनासाठी चित्रकारांच्या नावे देण्यात आला.
रांगोळी स्पर्धेत श्रीपाद इंगळे प्रथम
रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीपाद इंगळे यांनी पटकावला तर द्वितीय अंजली धसके व तृतीय क्रमांक महेंद्र मेटकरे यांनी मिळवला. रांगोळी प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून नितीन ठाकरे, विष्णु पूर्णये, स्वाती देशपांडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन धनंजय शेडबाळे यांनी केले तर आभार अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मधुरा कुलकर्णी, ओंकार गिरीधर, सचिन काळभोर यांनी विशेष परिश्रम घेतले.