नदी सुधार प्रकल्पाच्या भूसंपादनाला मिळणार गती!

0

पुणे । पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधारणा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जायका प्रकल्पाचा सल्लागार नियुक्तीचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर आता या प्रकल्पासाठी लागणार्‍या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात वडगाव, पुणे कँटोन्मेंटसह चार ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, पुढील चार महिन्यांत भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शहरात दररोज सुमारे 750 एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यातील केवळ 30 ते 40 टक्के पाण्यावरच प्रक्रीया करून ते नदीत सोडले जाते. तर उर्वरीत पाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे शहराच्या मधून वाहणारी मुळा-मुठा नदी या सांडपाण्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत आहे. नदीतील जैवविधता संपुष्टात आली असून देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये या नद्यांचा समावेश होतो. त्यामुळे शहरात नदीसुधार योजना राबविण्यात येणार आहे.

11 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणार
विविध 11 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’च्या (जायका) अर्थसहाय्यातून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याकरीता केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यातील निधी आला आहे. मात्र, या कामासाठी सल्लागाराची नेमणूक करणे लांबणीवर पडल्याने योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. त्यावरून ओरड सुरू होताच, राष्ट्रीय नदीसंवर्धन संचालनालयाने लंडनमधील ‘पेल फ्रिचमन’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केल्यानंतर आता भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून नदी सुधारणेच्या कामाला प्रत्यक्षात लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.