नदी सुधार प्रकल्पासाठी अहमदाबादचा सल्लागार

0

स्थायी समितीच्या सभेत मान्यता

पिंपरी-चिंचवड : शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. पिंपरी पालिका नदी सुधार प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला असून त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना व इंद्रायणी या गटारगंगा झाल्या आहेत. पालिकेचे शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. आता पालिकेतर्फे शहरातून वाहणार्‍या पवना व इंद्रायणी या दोन नद्यांचा सुधार प्रकल्प राबविण्यासाठी अहमदाबाद येथील एच.सी.पी. डिझाइन, प्ल्रॅनिंग, मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पवनेच्या शहरातील 18 किलोमीटरच्या पात्रासाठी या सल्लागाराला दोन कोटी 70 हजार, तर इंद्रायणीच्या 16 किलोमीटरसाठी एक कोटी 78 लाख 40 हजार रुपये दिले जाणार आहेत.