नफेखोरीसाठी रावेरातील अंबुजा सिमेंट मध्यप्रदेशात

0

अजनाडच्या सीमेवरून अवैधरीत्या सिमेंटची वाहतूक

रावेर– सिमेंट विक्रीचे टार्गेट पूर्ण व्हावे तसेच जास्त नफा मिळण्याच्या लालसेपोटी ‘अंबुजा सिमेंट’ची अजनाड गावाजवळून गेल्या चार महिन्यांपासून अवजड ट्रालाद्वारे मध्यप्रदेशात बिनबोभाट विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशापेक्षा रावेरात 25 रुपयांनी सिमेंट स्वस्त असल्याचा फायदा परप्रांतीय विके्रते घेत आहेत.

सीमेवरून पुरवले जाते सिमेंट
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात सिमेंटचे वेगवेगळे भाव असल्याने बर्‍हाणपूर परीसरातील किरकोळ दुकानदारांना सीमेवरुन सिमेंट पुरवले जात आहे. यामुळे आमच्या व्यवसायाचा मोठा फटका बसून नुकसान होत असल्याची भावना बर्‍हाणपूरचे डिलर्स अतुल पटेल यांनी व्यक्त केले. मागणी येईल तेथे माल देणार असल्याचे तुराब ट्रेडर्स व अंबुजा एजन्सीचे चालक यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

दोन्ही राज्यात अश्या आहे तफावत
अंबुजा कंपनीची एका बॅग महाराष्ट्रात 270 रुपये किंमतीने विकली जाते तर हीच बॅग 20 किलोमीटर अंतरावरील मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरात 295 रुपयांना विक्री केली जाते त्यामुळे एका बॅगेमागे 25 रुपयांचा फरक आढळतो. त्यामुळे बर्‍हाणपूर भागातून मोठ्या प्रमाणावर रावेरमधील सिमेंटला मागणी आहे. वाहतूक खर्च वगळूनही तेथील विके्रत्यांना मोठा आर्थिक लाभ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीकडे दाद मागणार -पटल
रावेरकडून अंबुजा कंपनीच्या बॅगा ट्रॉलाद्वारे बर्‍हाणपूरात विक्री होतात तर आपल्याकडे अंबुजा कंपनीची अधिकृत एजन्सी आहे. असे असताना रावेरमध्ये चालणार्‍या दुकानदारीमुळे आपल्या अधिकृत अंबुजा एजन्सीवरील विश्‍वास उडत असल्याची भावना एजन्सी चालक अतुल पटेल यांनी व्यक्त केली. या संदर्भात कंपनीकडे आपण दाद मागू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.