जळगाव । सुभाष चौक परिसरातील गांधी मार्केटमध्ये असलेल्या ओम नमकिन या दुकानाला 27 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील सर्व सामानासह फर्निचर व महत्वाची कागदपत्रांसह रोकड रक्कम जळून खाक झाल्याची घटना घडली असून ही आग मनपाच्या दोन अग्नीशमन बंबानी विझविली. यात तब्बल 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मधुकर भोई (वय-44) रा. जोशी पेठ, भोई गल्ली यांचे सुभाष चौक परिसरातील महात्मा गांधी मार्केट येथे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या शेजारील सावरिया स्वीट मार्टचे मालक गोविंद सारस्वत यांचा फोन आल्याने तुमच्या दुकानामधुन धुर निघत असल्याचे सांगितले. त्यानुसार सुभाष भोई यांच्यासह भरत शिरसाळे, योगेश वाडीले, मनोज जिरंगी यांची दुकानाजवळ धाव घेवून पाहणी केली तर दुकानातून धुर निघतांना दिसून आले.
लोखंडी शटरमध्ये उतरला वीजप्रवाह
दुकानाला आग लागल्याचे समजताच दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी दुकानाचे शटरमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तिघांना वीज प्रवाहाचा झटका लागला. त्यानंतर त्यांनी एमएससीबीचे कर्मचारी यांना या घटनेची कल्पना देवून त्यांना वीज प्रवाह खंडीत करण्याचे सांगितल्यावर घटनास्थळी येवून विज कर्मचार्यांनी वीज प्रवाह खंडीत केला. त्यानंतर दुकान उघडले असता दुकानातील सामानाला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. दरम्यान आग ही शॉर्टसर्किटमुळेच लागले असल्याचे समोर आले आहे.
रस्त्यावरून पोलिसांचे वाहन जातांना आले लक्षात
रात्री पोलिसांची गस्त असल्याने त्याच रोडवरून पोलिस कर्मचार्यांनी पेट्रोलिंग करत असतांना दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात आले. पोलिसांकडून दुकानदारांना संपर्क करता आले नाही. मात्र बाजूस असलेल्या सावलिया स्विट मार्टच्या मालकाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार स्विटमालक दुकानदार मालकाने सुभाष भोई यांना संपर्क साधून दुकानाला आग लागल्याचे सांगितले. दुकानाला आग लागल्यानंतर भोई यांनी दुकानाकडे एकच धाव घेतली होती.
तब्बल पाच लाखांचे नुकसान
या दुकानातील पीओपी, नमकीन, मुरमुरे, दाळ्या, फर्निचर, चार एलसीडी व सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दुकानातील महत्वाचे कागदपत्रे, तीन इलेक्ट्रिक पंखे तसेच 20 हजार रूपयांची रोकड जळून खाक झाली आहे. दरम्यान वीज प्रवाह शटरमध्ये उतरल्यानंतर वीज वितरणचे कर्मचारी तब्बल दीड तासांने उशिरा आल्याने आग विझविता आले नाही. त्यामुळे दुकानातील सामान पुर्णपणे जळून खाक झाला होता या आगीत दुकानदाराचे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी दीड तासापासून मनपाचा बंब येवून थांबला होता मात्र वीज प्रवाह दुकानात उतरल्याने त्यांना देखील काही करता आले नाही.