अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इव्हांका ट्रम्प यांचा बहुचर्चित भारत दौरा सोमवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी साबरमती आश्रमाला भेट, अहमदाबादमध्ये 22 किमीचा रोड शो आणि त्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद स्थित मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखों भारतियांशी संवाद साधला. गेल्यावर्षी अमेरिकेत झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या धर्तीवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रम्प परिवाराचे भारतात अभुतपूर्व असे स्वागत देखील झाले. या दौर्यामुळे भारत आणि अमेरिका यांचे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा भारत दौरा अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक प्रचाराचाच एक भाग असल्याचे मानण्यात येत असले तरी व्यापारीदृष्ट्या देखील यास अनन्यसाधारण महत्त्व निश्चितपणे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ढासळलेली अर्थव्यवस्था आणि निर्यातीत झालेली घट पाहता, भारताला अमेरिकेशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यात स्वारस्य आहे. कारण भारत ज्या परिस्थितीतून जात आहे, त्याला आर्थिक स्थैर्याची गरज आहे. यामुळे ही भेट आणि चर्चा भारताला निश्चितपणे उपयुक्त ठरु शकते.
भारत व अमेरिका यांच्यात पुर्वीपासूनच राजकीय व व्यापारी संबंध आहेत. 1959 पासून अमेरिकेच्या सहा अध्यक्षांनी भारताला भेट दिली आहे. ट्रम्प हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी भारताला विविध देशांच्या पंतप्रधानांनी अनेकवेळा भेट दिली असली तरी सध्या सुरु असलेल्या आर्थिक व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा भारत दौरा आहे. याची सुरुवात जोरदार झाली आहे. ट्रम्प यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रोड शो व सर्वात मोठी सभा असे वर्णन अमेरिकी माध्यमांनी केले आहे. मोटेरा स्टडियममध्ये ट्रम्प यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह भांगडा डान्स, होळी, दिवाळी, बॉलिवूड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांचा उल्लेख करत भारतियांची मने जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर भारताची गेल्या 70 वर्षांपासून डोकेदुखी ठरणार्या पाकिस्तानलाही कानपिचक्या दिल्या. कट्टर इस्लामिक दहशतावद्यांपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही दोघेही एकत्र येऊन काम करू, आम्ही आयएसआयएसचा नेता बगदादीला ठार केले. आम्ही पाकिस्तानरसोबत सीमेपलिकडचा दहशतावाद रोखण्याचा प्रयत्न करू, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. भारतासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण देश आहेच, परंतु अमेरिकेसाठीही भारत हा काही सामान्य देश नाही. त्यांच्यासाठीही भारत मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांची नाराजी ते ओढवून घेऊ शकत नाहीत. तिकडे चीनही संपूर्ण जग पादाक्रांत करण्यासाठी टपलेला आहेच. त्यामुळे भारत अमेरिकेसोबत असणे हे जसे भारताच्या फायद्याचे आहे, तसेच ते अमेरिकेच्याही फायद्याचे आहे. त्यामुळे हा दौरा केवळ भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही महत्त्वपूर्ण आहे. याची जाणीव ट्रम्प यांनाही असल्याने त्यांनी स्वत:ची प्रतिमा उजळवण्याचा पुरेपुर प्रयत्न दौर्याच्या पहिल्याच दिवशी केलेला दिसतो.
काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असतांना या विषयावर ते वारंवार भारत व पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची भाषा करतात, अर्थात भारत त्याला फारसे गांभीर्यांने घेत नसला तरी यामुळे भारतियांच्या मनात ट्रम्प यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. ज्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात होवू घातलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव ट्रम्प यांना निश्चितपणे असल्याने त्यांनी भारत व नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. भारतात मोदी आपले चांगले मित्र आहेत, परंतु भारताने व्यापारीदृष्ट्या आपल्याला नाराज केल्याची त्यांची भावना आहे. अमेरिकन वस्तूंवर भारतात मोठ्या प्रमाणावर कर आकारला जातो, यामुळे ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे मोठे नुकसान होते, असे त्यांना वाटते. मुख्यत: अमेरिकेतील हर्ले डेव्हिडसन मोटार सायकलींवरील उच्च जकात कराबद्दल त्यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ म्हटले होते. अमेरिकेने विशेषत: डाळींवरील कर कपात करण्याची मागणी केली आहे, तसेच भारताने काही डाळींच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याबद्दल जागतिक व्यापार समिती आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्याकडे तक्रार केली आहे. अमेरिकेतून भारतात येणार्या वैद्यकीय उपकरणांवर भारताने कर कपात करावी आणि भारताचे त्या उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण नसावे, असाही एक प्रस्ताव अमेरिकेने भारतासमोर ठेवला आहे. मात्र भारताने तेव्हाच कर वाढवले जेव्हा अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर कर लादले.
भारताच्या ल्युमिनियम आणि स्टीलवर अमेरिकेने कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे भारताने नाइलाजाने अमेरिकन बदाम आणि सफरचंदे यावर कर आकारले होते. हा ट्रेडवॉर दोन्ही देशांना परवडणारा नाही, याची जाणीव दोन्ही नेत्यांना आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वोच्च नेते आहेतच, शिवाय ते अमेरिकेतील दिग्गज उद्योजकही आहेत. रिअल इस्टेटसह अन्य उद्योगांमध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ट्रम्प यांनी उत्तर अमेरिकेनंतर रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक भारतात केली आहे. त्यामुळे भारत हा व्यापारासाठी कसा योग्य देश आहे, हे त्यांच्यापेक्षा कुणाला अधिक माहिती असणार? मात्र तरीही भारताला कोंडीत धरण्याची एकही संधी ट्रम्प सोडत नाहीत. अमेरिकेने भारताला विकसित देशांच्या यादीतून बाजूला केले असले तरी, अमेरिकेसाठी भारत ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि आपली व्यापारी गरज पूर्ण करण्याच्या हेतूनेच ट्रम्प यांनी या दौर्याचे आपल्या सत्ताकाळातील अंतिम टप्प्यात नियोजन केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. यावेळी त्यांनी ‘हाऊडी मोदी’ म्हणत लाखों भारतीय अमेरिकनांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले होते. हा दौरा मोंदींना राजकीयदृष्ट्या फायदेशिर ठरला होता. आता नजीकच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होवू घातली आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात असेल त्यात काहीच चुकीचे नाही. परंतु हा दौरा भारतालाही व्यापारीदृष्ट्या फायदेशिर ठरावा, अशी अपेक्षा आहे.