नमाजासाठी अजान आवश्यक; भोंगे नाही

0

नवी दिल्ली : मशिदीवरील भोंग्याच्याविरोधात व्टिट करून पार्श्‍वगायक सोनू निगम याला नेटकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता सोनू निगम याच्या मताशी काँगे्रस नेते अहमद पटेल यांनी सहमती दर्शवली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण मत मांडले आहे. नमाजासाठी भोंग्यांची गरज नाही, असे परखड मत पटेल यांनी व्यक्त केले आहे.

मी मुस्लिम नसूनही रोज सकाळी मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाने मला जागे व्हावे लागते. आपल्या देशातील ही बळजबरीच्या धार्मिक रुढी कधी थांबणार?, असं ट्विट सोनू निगम याने काल केले होते. त्याच्या या ट्विटनंतर मशिदीवरील भोंग्यांबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कुणी गायक सोनू निगम याच्यावर जोरदार टिका केली आहे. तर कुणी स्पष्ट बोलल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी मात्र यापैकी काहीही न करता तटस्थपणे आपले मत मांडले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. तो नमाजाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यात अजानासाठी लाउड स्पीकर्सची अजिबात गरज नाही.

सोनू निगम वक्तव्यावर ठाम
सोशल मीडियावरून जोरदार टीका झाल्यानंतरही सोनू निगम आपल्या मतावर ठाम आहे. त्याने आज नव्याने ट्विट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या ट्विटवरील तुमची भूमिका तुमचा बुद्ध्यांक दाखवते. मंदिरं आणि मशिदींवर भोंगे लावले जाऊ नयेत, हे माझं मत आजही कायम आहे, असे त्याने आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.