अंबाजोगाईत झाले प्रति-साहित्य संमेलन
अंबाजोगाई : परखड मत मांडणार्या नयनतारा सहगल यांना समेंलनाचे निमंत्रण नाकारणे हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण जोपासतो, अशा स्थितीत झालेला हा प्रकार निंदणीय असून सत्य ग्रहण करता आले पाहिजे. असे परखड मत प्रसिद्ध साहित्यीक तथा 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ तिवारी यांनी मांडले.
अंबाजोगाईत शुक्रवारी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नयनतारा यांना नाकारल्याबद्दल प्रति-साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रंगनाथ तिवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक अमर हबीब होते. तर व्यासपीठावर प्रसिद्ध कवी बालाजी सुतार, प्रा.डॉ.अरूंधती पाटील, प्रा.शैलजा बरूरे, दगडू लोमटे, मुजीब काझी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा.रंगनाथ तिवारी म्हणाले की, सत्तेच्या बळावर लोकांना हतबल करू नका. दुराग्रह व झुंडशाही पुढे चमडी बचावपणा न करता व्यवस्थेच्या विरूद्ध परखडपणे उभे राहिले पाहिजे. नयनतारा यांच्या पाठीशी त्यांचे बांधव ठामपणे उभे आहेत. ते अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाकारणार नाहीत . समाजातील वाढती निर्भयताच झुंडशाहीला आव्हान देईल. जात-धर्माच्या नावावर जी आडवणूक सुरू आहे, या विरूद्ध सामुहिकपणे आवाज उठविला पाहिजे. कोणाताही धर्म मानवतेची शिकवण देतो. तुम्ही धर्म पाळता, तर मग मानवता का सोडता? असा सवाल प्रा.तिवारी यांनी उपस्थित केला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना अमर हबीब म्हणाले की, संमेलन हे संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीत नयनतारा यांना नाकारून संमेलनाने सभ्यता सोडली आहे. हा सुरू असलेला प्रकार म्हणजे आणी-बाणीशी साधर्म्य आहे. संमेलन म्हणजे पैसा ही अपप्रवृत्ती बळावत चालली असून यातून नालायक लोकांचे वर्चस्व वाढले आहे. संमेलने साधी राहिली तर अशा अपप्रवृत्तींचा शिरकाव वाढणार नाही. संमेलने लोकाश्रीत झाली पाहिजेत. तरच संमेलनातील विकृती दुर होईल. साहित्य चळवळ भरकटत चालली असून सामान्य माणसांचा आवाज त्यांना दाबता येणार नाही. समाजात स्त्री, शेतकरी, कलावंत व साहित्यीक यांना गृहित धरले जात आहे. सत्तेची ही विचारधारा निषेधार्य असल्याचे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले.
कोणाचे ही अस्तित्व पुसता येत नाही – बालाजी सुतार
कोणाचेही अस्तित्व सहजपणे पुसता येत नाही. हाच प्रकार सहगल यांना निमंत्रण नाकारून साध्य करण्याचा प्रकार झाला. या घटनेचा निषेध म्हणून आपण यवतमाळ येथील संमेलनातील परिसंवादाचे निमंत्रण नाकारले. माणसाला बोलू न देणारी यंत्रणा कुचकामी ठरते. राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती ही संकल्पना मोडीत निघत असल्याचे प्रसिद्ध कवी बालाजी सुतार यांनी यावेळी सांगितले.
सत्य दडपण्याचे काम सरकार करीत आहे – प्रा.शैलजा बरूरे
सत्य दडपण्याचे काम सरकार कडुन सुरू आहे. असे सांगुन राष्ट्रपुरूषांचा द्वेष करण्याची भावना दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. नेहरू व गांधी यांना खलनायक ठरविणारे लोक समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. नयनतारा यांना पाठबळ देण्यासाठी संपुर्ण साहित्यीकांनी आपला आवाज उठविला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी प्रा.शैलजा बरूरे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा.अरूंधती पाटील यांनी उपस्थितांसमोर नयनतारा सहगल यांच्या उद्घाटकीय भाषणांचे वाचन केले. या प्रसंगी अनिता कांबळे, अमृत महाजन, राजेंद्र रापतवार व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. संचलन मुजीब काझी यांनी केले.
असा झाला ठराव
यवतमाळ येथे होत असलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून विख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिल्यानंतर त्यांचे भाषण पाहुन त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. ही घटना सभ्यतेला धरून नाही या सभ्यतेचा आम्ही जाहिर निषेध करतो.
लोकशाहीत मतभेत असणारच. ते स्विकारणे हेच लोकशाहीचे लक्षण आहे, पंरतु या घटनेत ते तत्व पायदळी तुडविण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील स्वातंत्र्य सैनिकांनी जी मुल्य सांभाळली व जी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली तीची पायमल्ली करण्यात आली आहे. म्हणून अंबाजोगाई येथील हे प्रति-साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कृतीबद्ध होण्याचा संकल्प करीत आहोत असा ठराव या प्रति-संमेलनात मांडण्यात आला.