काही गाणी गीत-संगीतामुळे लोकप्रिय होतात, तर काही त्यातील कलाकारांच्या लोकप्रियतेमुळे…. तर काही कोरिओग्राफीमुळे…पण काही गाणी मात्र सादरीकरण आणि नयनरम्य लोकेशन्समुळेही रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. सुरेख सादरीकरण आणि नेत्रसुखद लोकेशन्स यांचा अचूक मिलाफ असलेलं ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील ‘काय झालं कळंना…’ हे नवं कोरं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा. लि. प्रस्तुत व पंकज गुप्ता यांची निर्मिती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटात एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे.
प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही दिग्दर्शिका सुचिता शब्बीर यांनी कर्णमधुर गीतांची किनार जोडली असून कोरिओग्राफर सुजीत कुमार यांच बहारदार नृत्यदिग्दर्शन याकरिता लाभलं आहे. ‘काय झालं कळंना…’ हे गाणं त्यांनी महाराष्ट्रातील विविध नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलं आहे. यात खंडाळा, लोणावळा, ताम्हिणी, मुळशी, पुणे,खेडशिवापूर, सातारा, वाई, कराड, कोल्हापूर, जोतिबा, वसई तसंच मुंबईमधील वेगवेगळ्या लोकेशन्सचा समावेश आहे. माधुरी आशीरघडे यांनी लिहिलेल्या गीताला संगीतकार पंकज पडघन यांनी स्वरसाज चढवला आहे. ‘काय झालं कळंना…’ हे आपलं फेव्हरेट साँग असून, मराठी चित्रपटसृष्टीत हिट ठरेल असं पंकज मानतात. ‘दुनियादारी’ या चित्रपटातील ‘टिक टिक वाजते डोक्यात…’ या गाण्यानंतर ‘काय झालं कळंना…’ हे गाणंही रसिकांच्या पसंतीस उतरेल आणि ‘काय झालं कळंना’च्या आमच्या टिमला मोठं यश मिळेल अशी आशा पंकज यांनी व्यक्त केली आहे.
रोहित राऊत आणि सायली पंकज यांनी हे रोमँटिक द्वंद्वगीत गायलं आहे. कोरिओग्राफर सुजीत यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली असून, सुरेश देशमाने यांनी छायांकन केलं आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. ‘काय झालं कळंना’ची कथा सुचिता शब्बीर यांची असून, पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. राहुल मोरे यांनी या चित्रपटाचं संवाद लेखन केलं आहे. शब्बीर पुनावाला चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.