नयनाला न्याय!

0

आजही ‘त्या’ घरात ‘ती’ आहे. दरवाजा उघडताच समोरच्या दर्शनी भागातील छायाचित्राच्या रूपाने नाही तर घरातील प्रत्येकाच्या मनामनांत ती आहे. मी पुण्याला पुजारी कुटुंबाच्या घरी गेलो तेव्हा ते मला जाणवले होते. पुजारी कुटुंब हे मी ‘लढ म्हणा’ हा सामान्यांच्या असामान्य संघर्षाचा वेध घेणारा कार्यक्रम ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीसाठी सुरू केला तेव्हा पहिल्या भागाच्या वेळी संपर्कात आले. त्यांचा संघर्ष कानावर आला होता. पुण्याचे पत्रकार वैभव सोनवणेंच्या माध्यमातून पुजारींकडे पोहोचलो.

दरवाजा उघडताच नयना पुजारींचे दर्शन झाले. दरवाजासमोरच त्यांचे छायाचित्र. त्यांच्या छायाचित्राकडे मी पाहत असतानाच अभिजित शेजारी होते. माझं लक्ष गेलं. अभिजितचे डोळे भरून आले होते. नयना होत्याच तशा. गेल्या तरी मनात घर करून राहणार्‍या. हसर्‍या चेहर्‍याने जगाकडे पाहणार्‍या नयना. आपल्या जोडीदारासोबत मस्त जीवनाचे स्वप्न पाहतानाच त्या गेल्या. फक्त न सांगताच. जाऊ नये त्यावेळी त्यांना जावे लागले. नव्हे, नराधमांनी त्यांना जायला भाग पाडले, तेही अमानुष छळ करत.

अभिजित पुजारी सांगू लागले. नयना आणि त्यांचं छोटे सुखी कुटुंब. स्वप्नासारखं जीवन सुरू होतं. त्यातच 7 ऑक्टोबर 2009चा दिवस उजाडला. नयना नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात गेल्या. रात्री उशीर झाला तरी त्या परतल्या नाहीत. अभिजितला भीती वाटली. त्याने नयनांच्या कंपनीत कॉल केला. त्या निघाल्याचे सांगण्यात आले. मग मात्र अभिजितच्या मनात शंका-कुशंकांनी थैमान घातले. नयनाच्या येण्याच्या मार्गावर फेर्‍या मारत त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतानाच मनातही काहूर माजले होते. रात्र तशीच तळमळत गेली. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. नयनाच्या परिचयातील सर्वांकडेच चौकशी सुरूच होती.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

दुसर्‍या दिवशी पोलिसांचा फोन आला. एका ठिकाणी मृतदेह सापडला होता. तो त्यांनी पाहण्यासाठी बोलावले. तेथे पोहोचेपर्यंत अभिजितच्या मनात देवाचा धावा सुरू होता. तो मृतदेह नयनाचा नसू दे. नयनाचा नसू दे. मात्र, काहीवेळा जे नको असते तेच घडते. तो मृतदेह नयनाचाच होता. अभिजितच्या पायाखालील जमीनच सरकली. सारे काही संपले असेच वाटले. कसेबसे त्यांनी स्वत:ला सावरले. नयनाच्या मृतदेहाची अवस्था पाहून त्यांच्या मनातील दु:खाची जागा संतापाने घेतली. मनात आग भडकली. काही झाले तरी चालेल, पण नयनाची अशी अवस्था करणार्‍या नराधमांना सोडायचे नाही. त्यांना अद्दल घडवायचीच घडवायची. सोडायचे नाहीच नाही. तेथूनच सुरू झाला अभिजित पुजारींचा नयनाला न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा!

अभिजितने लढा देण्याचे ठरवले खरे. पण साथीला होते कोण? कोणीच नाही. काही मित्रांच्या मदतीने त्याने एकाकी लढा पुकारला. अखेर पोलिसांनी महेश ठाकूर, योगेश राऊत, राजू चौधरी आणि विश्‍वास कदम या चौघांना अटक केली. त्यातून 7 ऑक्टोबरच्या रात्रीचा घटनाक्रम उलगडला. नयना काम संपवून बाहेर आल्या. त्या बसस्टॉपवर थांबल्या होत्या. तेवढ्यात तेथे त्यांच्या कंपनीची एक कार तेथे आली. कार ओळखीचा चालकच चालवत होता. त्याने नयनांना कारने सोडण्याची तयारी दाखवली. खूप आग्रहानंतर त्या तयार झाल्या. पुढे जाताच त्याने मित्रांना कारमध्ये घेतले आणि मग काहीवेळातच नयनाचा विरोध बळजबरीने दाबून टाकत कार भलत्याच रस्त्याला गेली. ओसाड माळरानावर नेऊन नयनावर अमानुष अत्याचार करण्यात आले. तेथेच हे नराधम थांबले नाहीत. त्यांनी तिची क्रूरपणे हत्या केली. मृतदेह तेथेच फेकून ते निघून गेले.

पोलिसांनी अटक केली. न्यायालयात प्रकरण सुरू झाले. मात्र, योगेश राऊत हा आरोपी 18 सप्टेंबर 2011 रोजी पोलिसांच्या अटकेत असतानाच फरार झाला. बरेच दिवस पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नव्हते. त्याचा तपासावरही परिणाम झाला होता. का कोणास ठाऊक पोलीसही म्हणावे तसा तपास करीत नव्हते. त्यातच सन2012मध्ये दिल्लीचे निर्भया प्रकरण झाले. अवघा देश ढवळून निघाला. दिल्लीतील मेणबत्ती मोर्चांनी अभिजितना लढ्याचा नवा मार्ग दाखवला. त्यांनी जनजागरण करून मेणबत्ती मोर्चा काढला. समाज एकवटला. पोलिसांवरही दबाव निर्माण झाला. पोलीस पुन्हा सक्रिय झाले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जलदगती न्यायालयात खटला चालवून नयनाच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळवून देण्याची घोषणा केली.

खरेतर यानंतर एखादा पती शांत बसला असता. कायदा, पोलीस यंत्रणेवर विसंबून. पण अभिजित वेगळेच आहेत. त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. तेच योग्य झाले. जलदगती म्हणले जाते. माध्यमं बातम्या देतात. पण प्रत्यक्षात जलदगती म्हणवल्या जाणार्‍या न्यायालयातही काही कमी कामे नसतात. त्यात पुन्हा चांगला सरकारी वकील पाहिजे. नयनाच्या प्रकरणात आजवर सहा न्यायाधीश झाले. बदली मागून बदली होत राहते. तुकड्या-तुकड्यात खटले चालल्याने न्यायाधीशांवर जो एकसंध परिणाम झाला पाहिजे तो होत असेल का? माननीय न्यायाधीशांच्या क्षमतेबद्दल शंकाच नाही. आदरच. पण तीही माणसे आहेत, अशा सारख्या बदल्या योग्य कशा?

आता हे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद संपवला आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने न्यायालयात दिलेली साक्ष धक्कादायकच. ’नयना पुजारीवर अत्याचार करण्यापूर्वी तीन महिलांवर बलात्कार केले केले. त्यापैकी एका महिलेचा खूनही केला आहे. ही सर्व प्रकरणे पचली. त्यामुळे तू मुळीच घाबरू नकोस’, असे आरोपी योगेश राऊतने राजेश चौधरीला सांगितले होते. नार्को टेस्टमध्येही ही माहिती उघड झाली होती. असे आरोपी हे केवळ नयनाचे, अभिजितचे गुन्हेगार नाहीत. समाजाचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे असा लढा हा समाजाचा लढा मानला गेला पाहिजे. अपेक्षा आहे अभिजितचा लढा लवकरच यशस्वी होईल. नराधमांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तेवढ्याने भागणार नाही. आपणही बदलले पाहिजे. नयनावरील अमानुष अत्याचार आणि तिच्या हत्येनंतर अभिजितशी बोलणे बंद करणारे कमी नव्हते. नयनाने कारमध्ये लिफ्ट घेतलीच का? तिचाही दोष अशा फालतू चर्चा करणारेही होते. अशी चर्चा करणे म्हणजे सामाजिक गुन्हाच! आपण चर्चेत सहभागी होत नसू पण ती मुकाटपणे ऐकत जरी असू तरी तोही गुन्हाच! अशी गॉसिपिंग चर्चा थांबवणे हाही एक लढाच!
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत.)

माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने न्यायालयात दिलेली साक्ष धक्कादायकच. ‘नयना पुजारीवर अत्याचार करण्यापूर्वी तीन महिलांवर बलात्कार केले केले. त्यापैकी एका महिलेचा खूनही केला आहे. ही सर्व प्रकरणे पचली. त्यामुळे तू मुळीच घाबरू नकोस’, असे आरोपी योगेश राऊतने राजेश चौधरीला सांगितले होते. नार्को टेस्टमध्येही ही माहिती उघड झाली होती. असे आरोपी हे केवळ नयनाचे, अभिजितचे गुन्हेगार नाहीत. समाजाचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे असा लढा हा समाजाचा लढा मानला गेला पाहिजे. अपेक्षा आहे अभिजितचा लढा लवकरच यशस्वी होईल. नराधमांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तेवढ्याने भागणार नाही. आपणही बदलले पाहिजे. नयनावरील अमानुष अत्याचार आणि तिच्या हत्येनंतर अभिजितशी बोलणे बंद करणारे कमी नव्हते. नयनाने कारमध्ये लिफ्ट घेतलीच का? तिचाही दोष अशा फालतू चर्चा करणारेही होते, अशी चर्चा करणे म्हणजे सामाजिक गुन्हाच! आपण चर्चेत सहभागी होत नसू पण ती मुकाटपणे ऐकत जरी असू तरी तोही गुन्हाच! अशी गॉसिपिंग चर्चा थांबवणे हाही एक लढाच!
तुळशीदास भोईटे