नयना पुजारी खूनप्रकरणी तिघे दोषी

0

पुणे : संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर बलात्कार करुन खून केल्याचे आरोप सात वर्षांनी सिद्ध झाले असून, या प्रकरणी तिघा आरोपींना विशेष न्यायाधीश एल. एल येनकर यांनी दोषी ठरविले. या दोषींना मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. सुमारे सात वर्षांनंतर सोमवारी या खटल्याचा निकाल लागला.

सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी यांचे ऑक्टोबर 2009 मध्ये अपहरण करून, त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, ता. खेड) व विश्वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा), अशी दोषी ठरवण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाल्याने त्याची सुटका करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीत त्याची साक्ष महत्त्वाची ठरली. दोषी तिघा आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते.

या खटल्याचे कामकामज पाहण्यासाठी राज्य सरकारने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. आतापर्यंत चार न्यायाधीशांपुढे या खटल्याची सुनावणी झाली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी काम पाहिले.

या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा आहे. आरोपींचा गुन्हा करण्याचा हेतू व उद्देश सिद्ध होत आहे. माफीचा साक्षीदार असलेल्या चौधरीने नयना पुजारी व आरोपींना शेवटचे पाहिले होते. तसेच, वैद्यकीय पुरावाही भक्कम आहे. आरोपींनी त्याच्या मित्रांकडे गुन्ह्याची कबुली दिली होती. नयना पुजारीचे घड्याळ, दागिने आरोपींकडून जप्त करण्यात आले. आरोपींच्या कपड्यांवर नयना पुजारीच्या रक्तगटाचे रक्त आढळले. आरोपींच्या कपड्यांवर हे रक्त कसे, याचे स्पष्टीकरण बचाव पक्षास देता आले नाही. माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष आणि परिस्थितीजन्य पुराव परस्परांना पूरक आहेत, असे अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

चौधरीचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकार्‍यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणार्‍यांची साक्ष अशा मुद्यांच्या आधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. दोषींना मंगळवारी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्या. येनकर यांनी जाहीर केले.

या खटल्याच्या निकालासाठी सोमवारी न्यायालयात गर्दी झाली होती. आरोपींना फाशीची शिक्षाच सुनावली जावी, अशी मागणी नयना पुजारी यांच्या कुटुंबीयांनी केली. खुनाच्या आरोपींना ज्या प्रमाणे फाशीची शिक्षा सुनावली जाते, त्याप्रमाणे बलात्कार करणार्‍या आरोपींनाही फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे, अशी मागणी नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी यांनी केली.

ऑक्टोबर 2009 मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहर्‍यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तिघा आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केली होती. दरम्यान, सोमवारी या तिघा आरोपींना न्यायालयात आणण्यास सोमवारी काहीसा उशीर झाला. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली. तसेच, याबाबत पोलिसांना नोटीसही बजावली.