नरडाणा एमआयडीसीत सामावून घेण्याची शिंदखेडावासीयांची मागणी

0

शिंदखेडा । मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा गावच्या शिवारात असलेल्या एमआयडीसीत शिंदखेडा तालुक्यातील भूमिपुत्रांना सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून यासंदर्भात भूसंपादन अधिकार्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुका हा कायम दुष्काळी तालुका असून या तालुक्यातील शेतजमिन ही एकमेव उपजिवीकेचे साधन शेतकर्यांचे आहे.

या जमिनीतून शेतकर्यांच्या मागील पिढ्या पोसल्या गेल्या तर पुढील पिढीसाठीही तेच एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. असे असतांनाही केवळ शासनास सहकार्य व्हावे, तालुक्याची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शेतकरी एमआयडीसीला जमिन देण्यास तयार झाले. यावेळी धुळे येथील भुसंपादन अधिकारी काकुस्ते यांनी शेतकर्यांशी चर्चा करुन प्रती हेक्टरी 20 लाख रुपये भाव मिळेल, असे आश्‍वासन दिले होते. हि रक्कम कमी असून भूमिपुत्रांना एमआयडीसीत काम देवून सामावून घ्यावे, म्हणून 8 मे रोजी भारुळे यांनाही निवेदन दिले आहे. हा प्रश्‍न शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा असला तरी कुठलाही राजकीय पक्ष व सामाजिक संघटना भूमिपुत्रांच्या बाजूने उभी रहात नसल्याने आता शेतकरीच संघटीत होवून न्याय मागत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.