नरभक्षक बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी प्रशासन सज्ज

0

जळगाव : चाळीसगांव वनक्षेत्रातील नरभक्षक बिबट्यास प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख, नागपूर यांच्या कार्यालयाकडून ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. या बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी जळगाव, अमरावती, बुलढाणा, नाशिक येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बिबट्यास बेशुध्द करणारी 5 पथके बाधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेली आहेत.

वन विभागातील 10 व पोलिस विभागातील 10 शार्प शुटरची बिबट्यास ठार मारणेकामी नियुक्ती करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर वनविभागातील वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक मिळून सुमारे 122 वन अधिकारी, कर्मचारी पायी चालून बिबट्याचा शोध घेत आहेत. या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी बाधित क्षेत्रात 7 पिंजरे लावण्यात आलेले आहेत. तर अजून अतिरिक्त 5 पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बिबट्याच्या हालचाली पाहण्यासाठी 10 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. याशिवाय अजून 10 ट्रॅप कॅमेरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. वन अधिकारी, कर्मचारी यांना बिबट्याचा शोध घेण्यासाठी बाधित गावातील लोकप्रतिनिधी व तरुणांनी सक्रीय मदत करावी. असे आवाहन केले आहेत.